Mumbai Rains : ...अन् तोंड वर करून प्रशासनाला का दोष देता?

टीम ई सकाळ
मंगळवार, 2 जुलै 2019

इंटरनेटवर एक फोटो व्हायरल झाला. शहर तुंबलं, की सरकार आणि प्रशासनावर वार करायला आपण सगळेच सज्ज असतो. पण आपण स्वत: शहराची काय अवस्था करून ठेवतो, याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. यासंदर्भात 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर अनेक युझर्सने भावना व्यक्त केल्या. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया : 

मुंबई : जगातील सर्वांत महत्त्वाच्या शहरांपैकी एक अशी गणना होणारी मुंबई दरवर्षी पावसाळ्यात अडखळते. मुसळधार पाऊस आला, की मुंबईकरांचे हाल होणे हे तर ठरलेलंच आहे. वर्षानुवर्षं त्याच प्रकारच्या त्याच त्याच बातम्या येतात. 'मुंबई तुंबली', 'चाकरमान्यांचे हाल', 'मुंबईकर अडकले', 'प्रशासन आणि नागरिक हतबल' वगैरे! आता मीडियालाही या बातम्यांचं फारसं काही वाटेनासं झालंय. 

अशातच इंटरनेटवर एक फोटो व्हायरल झाला. शहर तुंबलं, की सरकार आणि प्रशासनावर वार करायला आपण सगळेच सज्ज असतो. पण आपण स्वत: शहराची काय अवस्था करून ठेवतो, याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतो. यासंदर्भात 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर अनेक युझर्सने भावना व्यक्त केल्या. त्यापैकी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया : 

अशी समस्या नेहमी येत राहते; म्हणून सर्वस्वी सरकारला दोष देणे योग्य नाही. आपणही त्याला कारणीभूत आहोत. आपणच बाटल्या, पाऊच रस्त्यात कुठेही टाकून देतो. 
- रामदास तायडे

यात सर्वांचा दोष आहे. मुख्य नाल्याजवळ राहणारे नागरिक संधी साधून कचरा याच प्रवाहात टाकून देतात. हे सगळे माहीत असूनही पावसाळ्याच्या आधी नाल्यांची सफाई होत नाही. 
- निलेश शेष 

सोशल मीडियावर मोठ्या गप्पा मारायच्या; पण स्वच्छता कोण ठेवणार? तुम्ही-आम्ही टाकलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, बाटल्या, सॅनिटरी पॅड्‌समुळे गटारं ब्लॉक होतात. प्रशासनावर, कर्मचाऱ्यांवर टीका करताना एक सुजाण नागरिक म्हणून आपण काय जबाबदारी पार पाडली, याचंही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. 
- गणेश ऐवले 

मुंबईत रस्त्यात किती ठिकाणी कचरापेट्या आहेत? लोकांना चांगल्या सवयी लावणार कोण? रेल्वे स्थानक, बस स्थानक, फुटपाथवर ठराविक अंतरावर कचरापेटी असायलाच हवी आणि रोजच्या रोज तो कचरा उचललाही गेला पाहिजे. हा एक छोटा बदल केला, तरीही मोठा फरक पडेल. 
- सचिन भोईटे 

मुंबईची क्षेत्रवार विभागणी करावी आणि ज्या भागातील नाल्यांमध्ये सर्वाधिक कचरा होतो, अशा विभागांना दंड करावा. जिथे नाले स्वच्छ असतील, तिथे नागरिकांना करात सुट द्यावी. 
- सचिन कडू 

खूप दिवसांनंतर असं ऐकायला मिळालं, की चूक आपलीच आहे आणि आपण त्यांना दोष देतोय.. प्रवास करताना कचरा जवळ न ठेवता बाहेर टाकून देतो आणि तोच नाल्यात अडकून बसतो. हे कुणाला कळत नाही आणि तोंड वर करून दुसऱ्यांना दोष देत बसतात. 
- दिवेश पाश्‍ते 

लोकांना दोष देण्याऐवजी सफाई कामगार आणि त्यांच्या साहेबांना रोज सकाळी पावसाळा सोडून कधीतरी नालेसफाईची आठवण करून द्या की! 
- सूरज थोरात 

'तुंबली, तुंबली' म्हणून ओरडणारे प्लॅस्टिकबंदीच्या नावानेही असेच ओरडत होते. 
- शरद जाधव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Facebook users react on Financial Capital Mumbai paralysed due to rain

टॅग्स