रिऍलिटी शोमुळे काही काळासाठी प्रसिद्धी

pulostav
pulostav

पुणे : ""हल्ली दूरचित्रवाहिन्यांवर रिऍलिटी शोचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे काही काळासाठी प्रसिद्धी मिळते. परंतु नव्या पिढीला आधी संगीत शिकू द्या, समजू द्या अन्‌ नंतर त्यांचे कार्यक्रम केले पाहिजेत. स्वर आणि लय मनाला भावत नाही, तोपर्यंत नवीन काही शिकता येत नाही,'' असे परखड मत ज्येष्ठ बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी व्यक्त केले. 

पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित "ग्लोबल पुलोत्सवा'च्या समारोप सोहळ्यानिमित्त चौरसिया यांना आमदार, महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते "पुलं स्मृती सन्मान' प्रदान करण्यात आला. या वेळी उस्ताद उस्मान खॉं यांचा 80व्या वर्षानिमित्त विशेष सन्मान केला. या वेळी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर, कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, पिनॅकल ग्रुपचे सीएमडी गजेंद्र पवार, आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअरचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य उपस्थित होते. 

आत्ताच्या काळातील चित्रपट संगीत म्हणजे काय हे समजतच नाही. एका चित्रपटासाठी चार-पाच संगीत दिग्दर्शक असतात. कोण काय संगीत देतो हे कोणालाच समजत नाही, असे चौरसिया यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. मराठीत दत्ता डावजेकर, राम कदम, स्नेहल भाटकर, सुधीर फडके यांच्यासारखे दिग्गज संगीतकार होऊन गेल्याचे त्यांनी नमूद केले. मी लहानपणापासूनच स्वरांशी खेळायला लागलो. मी पहिलवान व्हावे, अशी वडिलांची इच्छा होती. मात्र पहिले प्रेम संगीत होते. अर्थात, पहिलवानकी केली, त्याचा बासरीवादनासाठी खूप फायदा होत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

चौरसिया म्हणाले, ""पुलं यांची पहिली भेट मला आजही आठवते. माझा एक कार्यक्रम होता आणि त्याचे निवेदक काही कारणामुळे कार्यक्रमाला न पोचल्याने ऐनवेळी पुलंनी निवेदकाची भूमिका लीलया पार पाडली. एवढेच नाही, तर बहुधा तुमच्या आई-वडिलांना माहीत असावे, की तुम्ही बासरीवादक होणार आहात म्हणूनच त्यांनी तुमचे नाव हरिप्रसाद ठेवले, असे ते मला म्हणाले. त्या वेळी मी अवाक्‌ होऊन गेलो. त्यांची शब्दांची जाण मोहित करणारी होती. त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वतीचे वास्तव्य होते.'' 

आमदार टिळक म्हणाल्या, ""बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पुलंचा वाटा महत्त्वपूर्ण होता. गेल्यावर्षी बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनरुभारणीचा मुद्दा पुढे आला, त्या वेळी विविध क्षेत्रांतील व्यक्तींची मते लक्षात घेऊन याची दिशा ठरविली आहे. या संदर्भात रसिकांची कोणत्याही प्रकारे निराशा होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.'' 

पुढील जन्म पुण्यातच व्हावा... 
पुण्याविषयी माझ्या मनात कमालीचा आदर आहे. या ठिकाणी संगीत, साहित्य या विषयाला रसिक भरभरून दाद देतात. पुढील जन्म पुण्यात मिळो, अशी इच्छा असल्याचे चौरसिया यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com