अस्सल कलावंताची नजर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 नोव्हेंबर 2016

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाैथ्या स्मृतिदिनानिमित्त व्यंग्यचित्रकार या त्यांच्या पैलूविषयी दोन प्रसिद्ध व्यंग्यचित्रकारांनी व्यक्त केलेले मनोगत.

मंगेश तेंडुलकर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चाैथ्या स्मृतिदिनानिमित्त व्यंग्यचित्रकार या त्यांच्या पैलूविषयी दोन प्रसिद्ध व्यंग्यचित्रकारांनी व्यक्त केलेले मनोगत.

मंगेश तेंडुलकर

माझा आणि बाळासाहेबांचा परिचय १९६० पासूनचा. याच दरम्यान बाळासाहेबांनी साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरू केलं. माझीही व्यंग्यचित्रे मार्मिकमध्ये छापून यावीत, अशी माझी मनोमन इच्छा होती. म्हणून मी एके दिवशी पुण्याहून मुंबईला बाळासाहेबांच्या घरी गेलो. त्यांनी आनंदाने माझं स्वागत केलं. एखाद्या सामान्य माणसासारखीच त्यांची राहणी होती. त्यांनी मला बसायला सांगितलं आणि स्वतः खाली सतरंजीवर त्यांचं साहित्य घेऊन व्यंग्यचित्रं काढत बसले. मीही त्यांना व्यंग्यचित्र काढताना बघू लागलो. याआधी कुठल्याही निष्णात कलावंताला त्याची कलाकृती रेखाटताना पाहिलं नव्हतं. बाळासाहेब पेन्सिल न घेता थेट शाईने चित्र चितारायचे. एकदम शार्प पॉवरफुल फटकारे मारत आकाशात घिरट्या घातल्यासारखा त्यांचा ब्रश फिरे. त्यांनी क्षणार्धात माझ्यासमोर अटलबिहारी वाजपेयींचं चित्र पुरं केलं. एखादं व्यंग्यचित्र काढताना ते स्पष्ट विचार करून ठरवत. त्यानंतरच ते चित्रात साकारत. एखाद्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीवर घाईने भाष्य करत नसत. थोडा वेळ घेऊन अतिशय कल्पक विचार करून मग चित्र काढीत. मग त्यामुळे जे वादळ उठे, ते आपल्याला माहीतच आहे. 

राजकीय व्यंग्यचित्र काढताना जो पंच लागतो, तो त्यांच्याकडे होता. त्यांना कुणावर टीका करायची असल्यास ते थेट टीका करायचे. आचार्य अत्रेही यातून सुटले नव्हते. माझी व्यंग्यचित्रं बाळासाहेबांनी पाहिली आणि ती मार्मिकमध्ये आल्यानंतर बाळासाहेबांचे काही खास पैलू आपण स्वतः व्यंग्यचित्रातून रेखाटावेत, या विचाराने मी बाळासाहेबांना पंचेस आणि ठोसे देणारी काही व्यंग्यचित्रे काढली. पण ती व्यंग्यचित्रे कुणीच छापायला तयार होईना. मग मुंबईतील एका संपादकाने ती व्यंग्यचित्रं छापली आणि बाळासाहेबांना नेऊन दाखवली. त्यांनी चित्रं कौतुकाने पाहिली. त्यानंतर मी एका प्रदर्शनाला त्यांना बोलवायला गेलो असताना त्यांनी माझं त्या व्यंग्यचित्रांसाठी कौतुक केलं आणि म्हणाले, ‘‘कलाकाराला आपल्यावरील मिश्‍कील, मार्मिक भाष्य आणि टीका दोन्हीही खिलाडू वृत्तीने स्वीकारता आली पाहिजे.’’ त्यांच्या स्वभावातच खिलाडू वृत्ती होती.

भाषा आणि रेषा दोन्हींवर हुकमत  

विकास सबनीस

जे.   जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये कलेचं शिक्षण घेत असताना बाळासाहेबांच्या व्यंग्यचित्रकलेनं मी भारावून गेलो होतो. त्या वेळी त्यांनी आम्हाला शिकवायला असलेल्या फॅकल्टीमधील शिक्षकाचीच भूमिका निभावली. आम्ही त्या वेळी ‘मार्मिक’च्या अंकाची वाट बघत बसायचो. त्याच वेळी बाळासाहेबांची व्यंग्यचित्रकला पाहून मी मनाशी पक्कं ठरवलं, की मला कार्टूनिस्ट व्हायचंय. माझं शिक्षण पुरं झाल्यानंतर मग मी कुठल्याही ॲड एजन्सीत वगैरे काम न करता स्वतंत्र कार्टूनिस्ट म्हणून काम करू लागलो. ‘मार्मिक’मध्ये मी १२ वर्षं काम केलं. शिवसेनेचा पक्ष म्हणून उदय झाला आणि बाळासाहेबांची जबाबदारी वाढली. मग त्यांनी मार्मिकची जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्यांच्यातील कलावंताने मला अचूक हेरलं आणि मार्मिकच्या टीममध्ये सामावून घेतलं. बाळासाहेबांकडे माणसं हेरण्याची कला होती. त्यांच्यासोबत काम करताना सकारात्मक ऊर्जा जाणवायची. एका पक्षाचे प्रमुख असले, तरीही त्यांनी माझ्या व्यक्तिस्वातंत्र्यावर कुठलीही बंधनं घातली नाहीत. त्यामुळे त्यांच्याबरोबर मी प्रदीर्घ काळ काम करू शकलो. दुसऱ्याचा मान राखणं, त्याला आर्थिक गोष्टी कमी पडू नयेत म्हणून इतरत्र काम करायला स्वातंत्र्य देणं, त्यावर हरकत न घेणं, हे फक्त बाळासाहेबच करू शकतात. त्यांचा माझ्यावर खूप विश्वास होता. त्यांनी माझ्या ५० व्या वाढदिवशी स्वतः शब्दांकन केलेलं मानपत्र राज ठाकरेंच्या हस्ते देऊन सत्कार समारंभ आयोजित केला होता. 

मी जे यश मिळवलंय, त्यात बाळासाहेबांचा खूप मोठा वाटा आहे. बाळासाहेबांना उत्कृष्टतेचा ध्यास होता. व्यंग्यचित्रामध्ये एकही त्रुटी आवडत नसे. ॲनॉटॉमीबाबत ते काटेकोर असत. अफाट कल्पनाशक्तीचं सामर्थ्य त्यांच्याकडे होतं. व्यंग्यचित्रकला इतर कलावंतांनीही आत्मसात करावी, यासाठी त्यांची धडपड असे. त्याचं मराठी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं आणि विचारांमध्ये स्पष्टता होती. त्यामुळे त्यांची भाषणं आजही आपल्या स्मरणात आहेत आणि त्यांची कला आपल्याला नवं काही करण्याची प्रेरणा देते. भाषा आणि रेषा या दोन्ही गोष्टींवर त्यांची कमांड होती.

Web Title: Famous caricaturist views expressed