झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हावी - उद्धव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीकविमा योजनेमध्ये गैरव्यवहार होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

मुंबई - शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. पीकविमा योजनेमध्ये गैरव्यवहार होत असून, अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

या योजनेतील झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई व्हायला हवी. शेतकऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर सत्ता व युती काय कामाची असा इशाराही ठाकरे यांनी दिला. मुंबईत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या योजनेच्या प्रामाणिकतेबाबत उद्धव ठाकरे यांनी अनेक सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, की जून महिन्यात पीकविमा योजनेबाबत शिवसेनेने मोर्चा काढला होता. त्यात पंधरा दिवसांची मुदत कंपन्यांना दिली होती. शिवसेनेचे सर्व खासदार याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि योजनेत काय सुधारणा करता येईल हे सांगितले. शिवसेनेने प्रत्येक  तालुक्यात पीकविमा मदत केंद्रे उभारली होती. पीकविमा योजनेत ५३ लाख शेतकरी पात्र तर ९० लाख शेतकरी अपात्र ठरवले गेले. शिवसेनेने पीकविम्याचा प्रश्न हाती घेतल्यानंतर १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी मदत झाली. मात्र, शेतकऱ्यांना देणे असलेले २००० कोटी रुपये कंपन्यांकडे अजून पडून आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांची आहे.

पीकविमा योजनेमध्ये दोन टक्के रक्कम शेतकरी भरतात, तर उर्वरित ९८ टक्के रक्कम सरकारकडून दिली जाते. मात्र, विम्याची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही. शिवसेनेकडे या योजनेबद्दल अनेक तक्रारी आल्याचे ठाकरे यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Agriculture Insurance Scheme Crime Uddhav Thackeray