80 लाख शेतकरी पीकविम्यापासून राहणार वंचित 

तात्या लांडगे
शनिवार, 14 जुलै 2018

पीकविमा भरण्याकरिता शेतकरी सार्वजनिक सुविधा केंद्रात येतात. मात्र, मागील काही दिवसांपासून ऑनलाइन संगणकीकृत उताऱ्याचा सर्व्हर बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचे अर्ज भरता आलेले नाहीत. 
- सूरज कुचेकर, सीएससी केंद्रचालक

सोलापूर : खरीप हंगामात शेतकऱ्यांना पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत विमा उतरविण्याकरिता कर्जदार शेतकऱ्यांसाठी 24 जुलै तर बिगरकर्जदारांसाठी 31 जुलै अंतिम मुदत आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून ऑनलाइन सात-बाराच मिळत नसल्याने राज्यातील सुमारे 80 लाख शेतकरी अद्यापही पीकविमा भरू शकलेले नाहीत. मागच्या वर्षी काही शेतकऱ्यांना अत्यल्प रक्‍कम मिळाल्यानेही शेतकऱ्यांनी यंदा त्याकडे पाठ फिरविल्याची चर्चा आहे. 

आतापर्यंत राज्यातील दोन लाख 91 हजार 631 शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचा पीकविमा भरल्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून देण्यात आली. त्यामध्ये भंडारा, गोंदिया, नागपूर, पालघर, पुणे, सातारा, वर्धा आणि जळगाव या जिल्ह्यांमधील फक्‍त 51 शेतकऱ्यांचा समावेश आहे. तसेच नगर (2923), अकोला (1554), अमरावती (401), औरंगाबाद (4983), बीड (63751), बुलढाणा (20482), हिंगोली (17324), जालना (60330), लातूर (445), नांदेड (91989), नाशिक (167), उस्मानाबाद (6381), परभणी (14164), सांगली (675), सोलापूर (1815) आणि वाशिम जिल्ह्यातील चार हजार 96 शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे.

राज्यातील खातेदारांना डिजिटल स्वाक्षरीचा उतारा उपलब्ध करून देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, दुसरीकडे राज्यातील सर्व खातेदारांचा डाटा एकत्रित केल्याने सर्व्हरमध्ये जागाचा उपलब्ध नाही. त्यामुळे सध्या वारंवार सर्व्हर बंद अथवा डाऊन होत असल्याचे महसूल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ऑनलाइन सात-बारा उताऱ्याच्या घोळामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे. 

आकडे बोलतात... 
(2018) 
पीकविमा भरलेले शेतकरी 
83.12 लाख 
प्रिमियमची रक्‍कम 
563.29 कोटी 
(2019) 
पीकविमा भरलेले शेतकरी 
2,91,631 
प्रिमियमची रक्‍कम 
143.78 कोटी 

पीकविमा भरण्याकरिता शेतकरी सार्वजनिक सुविधा केंद्रात येतात. मात्र, मागील काही दिवसांपासून ऑनलाइन संगणकीकृत उताऱ्याचा सर्व्हर बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांचे अर्ज भरता आलेले नाहीत. 
- सूरज कुचेकर, सीएससी केंद्रचालक

Web Title: farmer crop insurance in Maharashtra