नैसर्गिक आपत्तींमुळे थकला बळिराजा

तात्या लांडगे
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

खरीप हंगाम २०१८ मधील दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. आता पुरामुळे नुकसान झालेल्यांसाठी सहा हजार ८१३ कोटींची मागणी केली असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
- राजश्री राऊत, उपसचिव, मदत व पुनवर्सन विभाग, मंत्रालय

दोन वर्षांत ८४ हजार कोटींचा फटका; पूर अन्‌ अतिवृष्टीची भरपाई मिळेना 
सोलापूर - दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, पूर, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींमुळे अवघ्या दोन वर्षांत शेतीचे तब्बल ८४ हजार कोटींचे नुकसान झाले. मदत मात्र २४ हजार ७०० कोटी रुपयांचीच जाहीर झाली. केंद्राकडून दुष्काळग्रस्तांना आतापर्यंत तीन टप्प्यांत चार हजार ५६२ कोटींची मदत मिळाली, तर राज्याकडून दोन हजार १०० कोटी मिळाले. पूर व अतिवृष्टीने बाधित बळिराजाला अद्याप मदतीची प्रतीक्षा आहे. 

नैसर्गिक आपत्तींच्या पंचनाम्यासाठी लागणारा विलंब, डोक्‍यावरील बॅंका अन्‌ खासगी सावकारांचे डोईजड झालेले कर्ज आणि प्रत्यक्ष झालेले नुकसान अन्‌ निकषांद्वारे मिळणारी तुटपुंज्या मदतीमुळे बळिराजापुढे मुलांच्या शिक्षणाचा अन्‌ विवाहाचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला. त्यातच ठिबक, शेततळे, हमीभाव, कांद्याच्या अनुदानाला उशीर, सन्मान निधीचा पत्ता नाही, तर कर्जमाफीचा लाभ घेता आला नाही, अशा स्थितीत गेल्या १५ वर्षांच्या तुलनेत २०१५ ते २०१९ या कालावधीत राज्यात तब्बल १५ हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दरम्यान, केंद्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती निवारण दल (एसडीआरएफ) मधून शेतकऱ्यांना भरपाई मिळते. मात्र, पंचनाम्याच्या अहवालानुसार हजारो कोटींचे नुकसान झाले असतानाही सरकारकडून मदतीला निकषांची कात्री लावली जाते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: farmer disturb by natural disaster