विमा योजना फसल्याचे मोर्चावरून स्पष्ट - बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

भूमिपुत्रांना आरक्षण देण्यात एकमत 
आगामी विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीचे सरकार आल्यास शासकीय व खासगी नोकरीमध्ये भूमिपुत्रांना ७५ टक्के आरक्षण देऊ अशी घोषणा अजित पवार यांनी केली. त्यावर थोरात म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये भूमिपुत्रांना आरक्षण देण्यासंदर्भात चर्चा झाली असून, त्यामध्ये आमच्यात एकमत झाले आहे. आघाडीच्या जाहीरनाम्यात याचा समावेश असेल.

पुणे - शेतकऱ्यांना विम्याचे पैसे मिळाले नाहीत म्हणून सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने कंपन्यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला. यावरून सरकारची पीकविमा योजनाच फसली असल्याचे स्पष्ट होत आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला. 

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बोलत होते. या वेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे उपस्थित होते.  

विधानसभेमध्ये काँग्रेस आघाडीच्या डबल जागा येतील असा दावा करत थोरात म्हणाले, यापूर्वीही काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्यानंतर १९९९ मध्ये आमची सत्ता होती. कार्यकर्त्यांमधील निराशा काढून त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण करणे आणि २५ ते ३० वयोगटातील मतदारांना पक्षाकडे आकर्षित करण्याचे आव्हान आमच्यासमोर आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसच्या नऊ जागा पडल्याने त्याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे विधानसभेला वंचितला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वंचितने राष्ट्रवादीला सोबत न घेण्याबाबत पत्रात काहीही लिहिलेले नाही. तसेच, मनसेला आघाडीत घेण्याचा प्रस्ताव आलेला नाही. पक्षातील नेते दुसऱ्या पक्षात जात असल्याने नवीन नेतृत्व तयार होत आहे. अनेक तरुणांनाही तिकीट वाटपात संधी मिळेल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी इंदापूरच्या जागेवर दावा केला असला तरी इंदापूरची जागा मिळाली पाहिजे, याबाबत पक्षाचे नेते निर्णय घेतील. शेतकऱ्यांचे प्रश्‍न, आर्थिक मंदी, बेरोजगारी यासह अनेक मुद्दे या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडे आहेत. 

लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर मतदारांना आश्‍चर्याचा धक्का बसला, लोकांच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाने एकदाची ही शंका मिटवून टाकली पाहिजे, असेही थोरात यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer Insurance Scheme Cheating balasaheb Thorat