कुटुंबांतील प्रत्येकाला दीड लाखांची कर्जमाफी

विकास गाढवे 
रविवार, 12 ऑगस्ट 2018

कर्जमाफीची व्याप्ती वाढणार
सरकारच्या या निर्णयामुळे कर्जमाफीची व्याप्ती वाढणार असून अनेक वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कुटुंबांची अट शिथिल झाल्याने कर्जमाफी मिळून नवीन कर्जासाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत. यात एक रकमी परतफेड योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. अनेक कुटुंबांत शेतकऱ्यासह त्याच्या पत्नी व मुलाचे नावाने थकीत कर्ज आहे. नवीन निर्णयामुळे पत्नी व मुलालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. प्रत्येकाला कर्जमाफीचा लाभ मिळण्याच्या आशेवर बसलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

लातूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून शेतकरी कुटुंबांला दीड लाख रूपयाच्या मर्यादेत कर्जमाफी देणाऱ्या सरकारने निर्णय बदलला आहे. आता कर्जमाफीसाठी पात्र कुटुंबातील प्रत्येक सदस्यांना प्रत्येकी दीड लाख रूपयाची कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने शुक्रवारी (ता. दहा) घेतला आहे. यात दीड लाखापर्यंतची कर्जमाफी घेण्यासाठी एकरकमी परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी भरणा केलेली जास्तीची रक्कम सरकार परत करणार आहे. यामुळे दीड लाखाहून अधिक थकीत कर्ज असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नापिकी, दुष्काळ तसेच विविध कारणांनी अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मागील वर्षी कर्जमाफी जाहिर केली. यात शेतकऱ्यांकडील थकीत कर्जाच्या दीड लाख रूपयाच्या मर्यादेतच सरकारने कर्जमाफी दिली आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता शेतकरी कुटुंबांला दीड लाखाला कर्जमाफी जाहीर करण्यात आली होती. यामुळे एका शेतकरी कुटुंबांत अनेक सदस्य कर्जमाफीसाठी पात्र असतानाही सर्वांना मिळून दीड लाख रूपयाच्या मर्यादेत कर्जमाफी देण्यात आली होती. कुटुंबांतील सर्व सदस्यांकडे दीड लाखाहून अधिक थकीत कर्ज असल्यास त्यांना अधिकच रक्कम भरल्यासच दीड लाखाच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येत होता. यासाठी कर्जमाफी योजनेत सरकारने खास एकरकमी परतफेड योजना सुरू केली होती.

मात्र, अनेक कुटुंबांकडे दीड लाखाहून कितीतरी अधिक थकीत कर्ज असल्याने त्यांनी कर्जमाफीचा लाभ घेतला नव्हता. या शेतकरी कुटुंबांना उर्वरित कर्जाची माफी मिळण्याची आशा होती. मागील वर्षापासून सरकारकडून पात्र शेतकरी तसेच शेतकरी कुटुंबांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, अनेक कुटुंबांनी कर्जमाफीचा लाभ घेतला नसल्याचे पुढे आले. दीड लाखापेक्षा अधिकचे कर्ज एकरकमी परतफेड योजनेत परत करूनही कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्सुक नव्हते. यातूनच कुटुंबांची अट न घालता प्रत्येक पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली होती. या मागणीसाठी संघटनांनी आंदोलनेही झाले. मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे या मागणीला बळ मिळाले. 

कुटुंबांची अट अखेर शिथिल
आंदोलनामुळे सरकारने उचल खाऊन कर्जमाफीतील कुटुंबांची अट रद्द करून कुटुंबांतील प्रत्येक पात्र सदस्यांना दीड लाख रूपयापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. कुटुंबांना कर्जमाफीचा लाभ घेताना दीड लाख रूपये वगळून एकरकमी परतफेड योजनेत उर्वरित रक्कम भरलेल्या शेतकऱ्यांना त्यांनी भरणा केलेली रक्कम परत मिळणार आहे. कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या अर्जदार शेतकरी कुटुंबातील सर्व कर्जदार सदस्यांना या माफीचा लाभ मिळणार आहे. यामुळे कर्जमाफीस पात्र असलेल्या लाभार्थीच्या याद्या नव्याने करण्यात येणार असून शेतकरी कुटुंबांतील कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक सदस्यांचा यादीत समावेश होणार आहे.

कर्जमाफीची व्याप्ती वाढणार
सरकारच्या या निर्णयामुळे कर्जमाफीची व्याप्ती वाढणार असून अनेक वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कुटुंबांची अट शिथिल झाल्याने कर्जमाफी मिळून नवीन कर्जासाठी शेतकरी पात्र ठरणार आहेत. यात एक रकमी परतफेड योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. अनेक कुटुंबांत शेतकऱ्यासह त्याच्या पत्नी व मुलाचे नावाने थकीत कर्ज आहे. नवीन निर्णयामुळे पत्नी व मुलालाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. प्रत्येकाला कर्जमाफीचा लाभ मिळण्याच्या आशेवर बसलेल्या शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

Web Title: farmer loan waiver in Maharashtra