शेतकरी आत्महत्या झाल्या कमी ! गतवर्षीच्या तुलनेत यंदा 262 ने घटले प्रमाण 

तात्या लांडगे
Monday, 28 December 2020

विभागनिहाय शेतकरी आत्महत्या (जानेवारी ते नोव्हेंबर) 

 • विभाग  कोकण  पुणे     नाशिक   औरंगाबाद  अमरावती  नागपूर 
 • 2019      1        85      442        835          953         216 
 • 2020      0        23      332        693          940         240 
 • एकूण      1       108    774        1528        1893        456 

सोलापूर : राज्यात दरवर्षी सरासरी तीन हजार शेतकरी आत्महत्या होतात. मागील वर्षी जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत दोन हजार 532 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर यंदा त्याचे प्रमाण घटले आहे. जानेवारी ते नोव्हेंबर 2020 या काळात राज्यात दोन हजार 270 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा कोकणात एकही आत्महत्या झाली नसून नागपूर व नाशिक विभाग वगळता अन्य सर्वच विभागांमध्ये शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झाल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाने दिली आहे.

आत्महत्या घटण्याची प्रमुख कारणे... 

 • खरीप व रब्बी हंगामात बॅंकांकडून गरजू शेतकऱ्यांना मिळू लागले तत्काळ शेती कर्ज 
 • शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे लक्ष; तांत्रिक प्रशिक्षणावर दिला जातोय भर 
 • महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत बळीराजाला शंभर दिवसांच्या रोजगाराची हमी 
 • खासगी सावकारांच्या कर्ज पुरवठ्यावर वॉच; शेतकऱ्यांना जमीन परत देण्याचा जिल्हा उपनिबंधकांना अधिकार 
 • नैसर्गिक आपत्तीत जमीन महसूल व वीज बिलात सुट, विद्यार्थ्यांना मिळते परीक्षा शुल्क माफी 
 • नव्या सरकारकडून उपाययोजनांची अपेक्षा; कर्जमाफीमुळे डोक्‍यावरील कमी झाला कर्जाचा बोजा 

 

नैसर्गिक आपत्ती काळात सरकारकडून मिळणारा दिलासा, अल्पावधीत मिळणारी भरपाई, बॅंकांच्या कर्जासाठी कमी झालेले हेलपाटे, खासगी सावकारांवर गृह विभगाचा वॉच, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांना दिले जाणारे तांत्रिक प्रशिक्षण आणि सरकारकडून मिळालेली नुकसान भरपाई बॅंकांनी कर्जात वर्ग न करता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सरकारने दिलेले आदेश, या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्याचे निरीक्षण मदत व पुनर्वसन विभागाने नोंदविले आहे. तसेच आरोग्य, पशुसंवर्धन, शिक्षण, महिला व बालकल्याण, कृषी आणि मदत व पुनर्वसन विभागाच्या योजनांचा लाभ आता थेट शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचला आहे. तर राज्यातील नव्या सरकारकडून वाढलेल्या अपेक्षा आणि कर्जमाफीचा झालेला लाभही त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, अकोला, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली या जिल्ह्यातील आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे. 

विभागनिहाय शेतकरी आत्महत्या (जानेवारी ते नोव्हेंबर) 

 • विभाग  कोकण  पुणे     नाशिक   औरंगाबाद  अमरावती  नागपूर 
 • 2019      1        85      442        835          953         216 
 • 2020      0        23      332        693          940         240 
 • एकूण      1       108    774        1528        1893        456 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer suicides reduced! Compared to last year, the number has decreased by 262 this year