शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याची पोलिसांना थेट विक्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

पोलिस सरकारी कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आणि ठाणेकरांना माझी विनंती आहे की, दुष्काळी भागातील या प्रामाणिक व कष्टाळू शेतकऱ्यांचा भाजीपाला तुम्ही खरेदी करा. तुमच्यामुळे शेतकरी जगायला मदत होणार आहे.
- सयाजी शिंदे, अभिनेता

मुंबई - शेतकरी व पोलिस हे समाजातील अत्यंत महत्त्वाचे दोन घटक आहेत. हे दोन्ही घटक एकत्र येण्याचा योग दुर्मिळच म्हणता येईल. ठाणे पोलिस आयुक्तालयाने हाती घेतलेल्या अभिनव उपक्रमामुळे पोलिस व शेतकरी एकत्र येणार असून, त्यांच्यातील अनोखा "नातेसंबंध' समोर येणार आहे.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, धान्य, कडधान्ये असा विविध प्रकारचा शेतमाल ठाणे पोलिसांच्या वसाहतींमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (ता.9) या उपक्रमाला सुरवात होईल. पोलिसांच्या कुटुंबीयांबरोबरच इतर खात्यातील सरकारी कर्मचारी व ठाणेकर नागरिकांनाही या ठिकाणी शेतमाल खरेदी करता येईल. अभिनेते सयाजी शिंदे ज्या गावांमध्ये दुष्काळमुक्तीचे काम करीत आहेत, त्या पांढरवाडी, कोळेवाडी, गोडसेवाडी व दिवडी (ता. माण, जि. सातारा) या चार गावांतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतमाल पोलिसांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त परमबीरसिंग, सहपोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे व पोलिस उपायुक्त डॉ. रश्‍मी करंदीकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

व्यापारी, दलाल व मध्यस्त यांना वगळून शेतकऱ्यांचा हा माल थेट विक्रीसाठी येणार असून, ग्राहकांना तो स्वस्त दरात उपलब्ध केला जाणार आहे. मध्यस्त नसल्याने शेतकऱ्यांनाही जादा पैसे मिळू शकतील.
सुरवातीला आठवड्यातील दोन दिवस व कालांतराने दररोज हा उपक्रम राबविण्यात येईल.

संबंधित चार गावांतील सामान्य लोकांनी एकत्रित येऊन "चार गाव जलयुक्त शिवार अभियान' ही चळवळ उभी केली होती. या चळवळीअंतर्गत लोकसहभागातून जलसंधारणाची 50 लाख रुपयांची कामे झाली आहेत. सयाजी शिंदे व त्यांच्या मित्र परिवाराने या गावांत सुमारे 30 लाखांची कामे केली आहेत. गावांतील आदर्श कामांची दखल घेत राज्य सरकारनेही जलसंधारणाच्या कामासाठी तीन कोटी रुपयांचा निधी दिला होता.

जलसंधारणानंतर आता शेतकऱ्यांची प्रगती करण्याच्या उद्देशाने या चार गावांतील शेतमाल पोलिस ठाण्यात विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

दर्जेदार व ताजा माल मिळणार
दुष्काळी भागातील या चार गावांमध्ये कोणत्याही औद्योगिक कंपन्या नाहीत. त्यामुळे तिथे कसलेही प्रदूषण नाही. बिसलेरीपेक्षाही स्वच्छ नैसर्गिक पाण्यामध्ये या ठिकाणी पिके काढली जातात. बागायती शेतकऱ्यांच्या तुलनेत हे शेतकरी कीटकनाशके, रसायने यांचा अत्यल्प वापर करतात, किंवा बऱ्याच पिकांमध्ये वापरही होत नाही. शिवाय, शेतातून काढलेला भाजीपाला कोणत्याही बाजारात न नेता तो थेट पोलिस वसाहतीमध्येच येणार आहे. त्यामुळे दर्जेदार, स्वस्त आणि ताजा भाजीपाला व शेतमाल ठाणे पोलिस व इच्छुक सामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे.

'सकाळ'चे योजनेमध्ये योगदान
चार गावांतील जलयुक्त शिवार अभियानासाठी "सकाळ'च्या तनिष्का गटामार्फत जलसंधारणाच्या कामासाठी "सकाळ रिलीफ फंड'अंतर्गत दोन लाख रुपये मदत करण्यात आली होती. या अभियानासाठी "तनिष्का'च्या सदस्यांनी दोन वर्षे अथक परिश्रम घेतले आहेत.

Web Title: farmer vegetable direct sailing to police