कर्जमाफी योजनेची पोलखोल करणाऱ्या शेतकऱ्यालाच अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जून 2019

धनंजय मुंडे यांनी कर्जबाजारी शेतकरी अशोक मनवर यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यानंतर चिडलेल्या पोलिसांनी मनवर यांनाच विधीमंडळाच्या परिसरातून अटक केली.

मुंबई : गाजावाजा करून सुरू झालेल्या राज्यसरकारच्या कर्जमाफी योजनेतला फोलपणा आज (शुक्रवार) पुन्हा एकदा उघडा पडला. केवळ कर्जमाफीचे प्रमाणपत्रच सन्मानपूर्वक पदरात पडलेल्या अशोक मनवर यांना कर्जमाफी न मिळता पोलिसांकडून अटक मात्र करून घ्यावी लागली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीने दोन वर्षांपूर्वी कर्जमाफीचे प्रमाणपत्र सन्मापूर्वक मिळालेले वाशिमच्या जामरूण जहांगीर गावातील शेतकरी अशोक ग्यानूजी मनवर आज दोन वर्षांनंतरही कर्जबाजारी आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सहीचे १ लाख ४० हजार रुपयांच्या कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळूनही त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. मंत्रालयात या बाबत विचारणा करण्यासाठी येत असताना मनवर यांना पोलीसांनी अटक करुन तब्बल 3 तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.

दरम्यान, विधान परिषदेत उपस्थित तारांकित प्रश्नाच्या चर्चेत सहभागी होताना धनंजय मुंडे यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांची व्यथा मांडली. मुख्यमंत्र्यांच्या कर्जमाफी प्रमाणपत्रानंतरही डोक्यावर कर्ज असलेल्या अशोक मनवर यांच्या कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत सभागृहात सादर करुन त्यांनी सरकारच्या कर्जमाफी योजनेचे वाभाडे काढले. कर्जमाफी होऊन दोन वर्षे झाली तरी शेतकऱ्यांची कर्जे माफ झालेली नाहीत. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सरकारकडून खोटी आकडेफेक केली जात असून त्याचा वस्तुस्थितीशी काहीही संबंध नाही. सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना झाला नाही. डोक्यावर कर्ज असल्याने बँका शेतकऱ्यांना नवी कर्जे देत नाहीत, अशा चक्रव्यूहात शेतकरी अडकला असल्याकडे धनंजय मुंडे यांनी सरकारचे लक्ष वेधले. राज्यातल्या समस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे, या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. 

धनंजय मुंडे यांनी कर्जबाजारी शेतकरी अशोक मनवर यांचा मुद्दा सभागृहात उपस्थित केल्यानंतर चिडलेल्या पोलिसांनी मनवर यांनाच विधीमंडळाच्या परिसरातून अटक केली. या अटकेचा मुद्दा सभागृहात उपस्थित करुन धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्याच्या अटकेचा व सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेचा तीव्र निषेध केला. सरकारने मनवर यांची तात्काळ सुटका करून त्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना निलंबित करावे, अशी मागणी मुंडे यांनी केली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक यांनी धनंजय मुंडे यांच्या मागणीला प्रतिसाद देत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmer was arrested for responsible of disclosing the fraud in loan waiver scheme