शेतकऱ्यांचे वैरीच सत्तेत बसलेत : पवार

Farmers' enemies are in power: Pawar
Farmers' enemies are in power: Pawar


नगर : शेतकरी, सर्वसामान्य घटकांविषयी अनास्था असलेले लोक सत्तेत बसले आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळ आणि दुसरीकडे महापुरासारखी संकटे असताना सत्ताधारी मात्र सत्ता द्या, असं म्हणत गावभर हिंडत होते, हे राज्यासाठी खूप दुर्दैवी आहे. एकीकडे उद्योगधंदे बंद पडत आहेत. कुणाच्याच हाताला काम राहिलेले नाही. त्यामुळे ही परिस्थिती जर बदलायची असेल, तर सामूहिक शक्ती बरोबर घेऊन महाराष्ट्राचा चेहरा पुन्हा एकदा बदलावा लागेल. त्यात पक्षातून गेलेल्यांचा विचार नकोच. उगवत्यांचा विचार करा, अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे मांडली.


राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे नगरमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पक्षाचे निरीक्षक व ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, निरीक्षक अंकुश काकडे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप व राहुल जगताप, प्रसाद तनपुरे, अविनाश आदिक, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, डॉ. सर्जेराव निमसे, प्रताप ढाकणे, संदीप वर्पे, निर्मला मालपाणी यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.


आज आचारसंहिता लागू झाली. आता खऱ्या अर्थाने लढाई सुरू झाली आहे. त्यामुळे "भाजप सरकार चले जाव' असा नारा देऊन पवार म्हणाले, ""मावळतीचा इतिहास लिहिणारे आम्ही नाहीत. उगवत्यांना घडविणारे आहोत. तरुणांमधील नवनेतृत्व उभे केले जाईल. हे नेतृत्व आगामी महाराष्ट्राला उपयोगी पडेल. त्यात स्वाभिमान टिकवण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रात कॉंग्रेस आघाडीचे सरकार आणावे लागेल. ज्या शिवाजी महाराजांच्या किल्ल्यात तलवारीचा खणखणाट झाला, त्याच किल्ल्यांवर हे सरकार छमछमाट करत आहेत. आम्ही डान्स बार बंद केले. ते या सरकारने सुरू केले. शेतकरी, स्थानिक समस्या, युवकांची बेरोजगारी, आर्थिक मंदीविषयी हे सरकार बोलत नाही. ते काश्‍मीर, पाकिस्तान, अमेरिका अशा गोष्टी दाखवते. 370वे कलम रद्द केले. ही चांगलीच गोष्ट झाली. मात्र, हे सरकार 371वे कलम असलेल्या स्वायत्त राज्यांविषयी काहीच बोलत का नाही?''
पक्षातून बाहेर पडणाऱ्यांविषयी त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, ""पक्षातून बाहेर जाणारे प्रथम मला भेटले. खिशातून कागद काढून माझ्यामागे हीही चौकशी लागलीय. असे सांगायचे. चुकीची कामे केली असतील, तर त्याचे परिणाम भोगावे लागणारच. ते म्हणायचे "माझ्या हृदयात तुम्हीच आहात'. त्यांचे हृदय मी मावेल एवढे विशाल आहे काय? असा प्रश्‍न मला पडतो.''


ज्येष्ठ नेते वळसे पाटील, आमदार संग्राम जगताप व राहुल जगताप, संदीप वर्पे, युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, अल्पसंख्याक आघाडीचे पदाधिकारी अब्दुल गफार यांची भाषणे झाली. प्रास्ताविक पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com