शेतकऱ्यांनो घाबरु नका; आधार कार्ड नसले तरी मिळतात विम्याचे पैसे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जुलै 2019

- आधार कार्ड नसले तरी विम्याचे पैसे मिळणार
- माहितीच्या अधिकारात राजपत्र उघड
- माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दूल देशपांडे यांनी केला उलगडा

मुंबई : आधार कार्ड नसल्याने अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. पण आता शेतकऱ्यांकडे आधार कार्ड नसले तरी विम्याचे पैसे मिळणार असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

राज्यातील कृषी खात्यातील विविध योजनांची वाढत जाणारी संख्या आणि त्यासाठी पात्र असण्याची मुख्य अट म्हणजे संबंधित शेतकऱ्यांकडे आधार कार्ड हवे, ह्या डोकेदुखीमुळे राज्यातील बहुतांश शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहत होते.
हीच बाब प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये मिळणाऱ्या नुकसान भरपाईबाबत देखील घडत होती.

केवळ आधार कार्ड नाही म्हणून कृषी खात्यातील विविध योजनांपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले जात आहे. विशेष म्हणजे बँका आणि विमा कंपन्या आधार कार्डचे जुजबी कारण सांगून शेतकऱ्यांना पळवून लावत आहेत. मात्र ह्या सर्व समस्येवर माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीने उत्तर मिळाले आहे.

केंद्र सरकारने वर्ष 2017 सालीच राजपत्राद्वारे या संदर्भात स्पष्ट आदेश दिलेले असून त्यात आधार कार्ड जरी नसले किंवा त्यासाठी नाव नोंदणी केली असेल तर इतर 05 ओळखपत्राद्वारे संबंधित योजनेचा लाभ कोणत्याही पात्र शेतकऱ्यांस देने बंधनकारक आहे असे सांगितले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दूल देशपांडे यांनी केंद्र सरकारला विचारलेल्या प्रश्नात ह्या माहितीचा उलगडा झाला आहे. आजघडीला राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे हक्काचे पीक विम्याचे, कर्जमाफीचे पैसे हे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक नसल्याचं कारण सांगून संबंधित पात्र शेतकऱ्याला अपात्र करण्याचे ठरवून त्याला त्याच्या हक्काच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे.

वर्ष 2017 मध्ये कृषी मंत्रालयाने राजपत्र काढून या संदर्भात स्पष्ट आणि तपशीलवार खुलासा केला आहे. ज्यामध्ये म्हणले आहे की, जर एखाद्या शेतकऱ्याने आधार कार्ड काढलेले नसेल किंवा आधारसाठी नाव नोंदवले असेल तरीही त्याला कृषी खात्याच्या सर्व योजनांचा लाभ 100% दिला जावा. मात्र त्यासाठी आधार कार्ड ऐवजी त्याची ओळख पटविण्यासाठी इतर 05 ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र देणे बंधनकारक आहे.

Image may contain: text

१) मतदान ओळखपत्र
२) वाहन चालविण्याचा परवाना
३) बँकेचे पासबुक
४) कृषी किसान पासबुक
५) नरेगा जॉबकार्ड
६) जर आधार कार्ड साठी नावनोंदणी केली असेल तर त्याची पावती. 

वरीलपैकी कोणतेही एक कागदपत्रे दाखवून शेतकरी त्याला मिळत असलेल्या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers without Aadhar Card can also claim for crop insurance