ऊसदरासाठी 'बळीराजा'चे आमरण उपोषण

तानाजी पवार
सोमवार, 22 मे 2017

बळीराजा संघटनेचा साखर आयुक्त कार्यालयासोर आमरण उपोषणास प्रारंभ

पुणे : महाराष्‍ट्रातील सहकाराचा आदर्श घेऊन गुजरातमध्ये उसाला प्रतिटन ४ हजार ४४१ रुपये दर दिला जातो. मग तो दर महाराष्ट्रात का दिला जात नाही. तसेच, सन २०१६-१७ मध्ये गळीत झालेल्या उसाचे दुसरे बिल प्रतिटन १ हजार रुपये प्रमाणे मिळावे अशा विविध मागण्यांसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने आजपासून येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ करण्यात आलेला आहे. बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे उपोषण शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे घेणार नसल्याचे पाटील यांनी सांगितले.  

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सन २०१६-१७ मधील गळीत हंगामातील दुसरा हफ्ता रुपये १ हजार रुपये प्रमाणे तातडीने त्यांच्या बँक खात्यावर मिळावा, तसेच, मागील वर्षीच्या (सन-२०१६-१७) FRP नुसार राहिलेली देय रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, संपुर्ण साखर कारखानदारी सहकारी व खासगी कारखाने यामध्ये वजनकाटे, शुगर बॅग्ज पॅकींग इन शुगर सायलो इन शुगर हाऊस, डिस्टलरी, इथेनॉल, को-जनरेशन या विभागाला अद्ययावत तंत्रज्ञानाने आॅनलाईन करुन ती शेतकऱ्यांना माहितीसाठी खुली करुन देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत असल्याचे बी. जी. पाटील व पंजाबराव पाटील यांनी सांगितले.

उपोषणात संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील, अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्यासह साजीद मुल्ला, उत्तम साळुंखे, सुधीर कदम, अमोल चव्हाण, अशोक सलगर, अजित बोरकर, दादा काळे, साधू राऊत यांच्यासह पुणे जिल्ह्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी शासन व साखरसम्राट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 
 

Web Title: fast unto death for sugarcane bills by baliraja farmers organisation