जिल्हा परिषद शाळांना कुणी शिक्षक देता का शिक्षक? 

अक्षय गुंड - सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

उपळाई बुद्रूक - प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य मुले वंचित राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र सध्या माढा तालुक्‍यात दिसून येत असल्याने "कुणी शिक्षक देता का? शिक्षक' अशी म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे. 

उपळाई बुद्रूक - प्राथमिक शिक्षण हा विद्यार्थ्यांचा पाया असतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणापासून शाळाबाह्य मुले वंचित राहू नये यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चित्र सध्या माढा तालुक्‍यात दिसून येत असल्याने "कुणी शिक्षक देता का? शिक्षक' अशी म्हणण्याची वेळ पालक व विद्यार्थ्यांवर आली आहे. 

माढा तालुक्‍यातील कित्येक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्‍यात आले आहे. अनेक ठिकाणी गेली तीन ते चार महिन्यांपासून शिक्षक बदलून गेले असून त्या जागा रिक्तच आहेत. उपळाई बुद्रूक जिल्हा परिषद केंद्र शाळा अंतर्गत असलेल्या म्हसोबावाडी व देशमुख-बेडगे वस्ती या दोन्ही शाळेत एक-एक जागा शिक्षकांची रिक्त आहे. म्हसोबावाडी येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू असून 25 इतकी विद्यार्थी संख्या आहे. येथे दोन शिक्षकांच्या जागा असून गेली अडीच वर्षे झाले येथे दोन कायमस्वरूपी शिक्षक मिळत नसल्याने येथील शिकवण्याचा कारभार एकाच शिक्षकांवर अवलंबून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरेसे शिक्षण मिळत नाही. अशीच काही परिस्थिती देशमुख-बेडगे वस्तीवर आहे. येथे पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग असून 46 इतकी पटसंख्या आहे. जून महिन्यात येथे जिल्हा बदली अंतर्गत बदलून आलेल्या शिक्षकांची सप्टेंबरमध्ये बदली करण्यात आली. त्यानंतर त्या जागेवर शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे दोन ते तीन महिने झाले येथील विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम एकाच शिक्षकांवर अवलंबून आहे. 

 

शाळाबाह्य कामांनी शिक्षकांची दमछाक 

ज्या ठिकाणी पटसंख्या 20 पेक्षा जास्त, त्याठिकाणी दोन शिक्षकांची आवश्‍यकता आहे. परंतु 46 पटसंख्या असतानाही एकच शिक्षक त्या शाळेचा गाडा हाकताना दिसत आहे. त्यातच त्या शिक्षकांना शाळबाह्य कामे, केंद्राची बैठकी, नव्याने सुरू केलेल्या "सेल्फी विथ टिचर' अशी सर्व कामे एकहाती पार पाडावी लागत आहेत. त्यामुळे एका शिक्षकाची पुरती दमछाक होत आहे. तालुक्‍यात अशा अनेक शाळा आहेत की, विद्यार्थी संख्या जास्त तर शिक्षक संख्या कमी अशा परिस्थितीमुळे शिक्षक व विद्यार्थी या दोघांवरही अन्याय होत आहे. 

 

तालुक्‍यात सध्या 81 शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अंतिम संच मान्यतेचे काम शासनाकडे पाठवले आहे. शासनाने अद्याप अंतिम संच मान्यतेवर शिक्कामोर्तब केलेले नाही. संचमान्यता मिळाल्यास तालुका समायोजनने शिक्षकांच्या रिक्त जागेचे प्रश्‍न सुटतील. या महिनाखेरीसपर्यंत काही शाळांचे प्रश्‍न सुटतील. 

-सुहास गुरव, प्रभारी गटशिक्षणधिकारी 

 

संपूर्ण जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त जागा आहेत. गेली सहा वर्षे झाले शिक्षक भरती नसून शिक्षक निवृत्त व बदली होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे रिक्त जागा प्रश्‍न भेडसावत आहे. तालुका समायोजन करून 15 दिवसांच्या आत प्रश्‍न सोडवू. 

- तानाजी घाडगे, प्राथमिक जिल्हा शिक्षणधिकारी 

 

म्हसोबावाडी येथे गेली तीन वर्षे कायमस्वरूपी शिक्षक मिळालेला नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. एका शिक्षकावर सर्व कामाचा बोजा आहे. या महिन्यात येथे शिक्षक उपलब्ध न झाल्यास शाळेला कुलूप ठोकले जाईल 

- सिद्धनाथ शेंडे, पालक, उपळाई बुद्रूक 

Web Title: The fate of the students because teachers have been threatened