प्रॉपर्टीसाठी वडिलांकडून मुलाला जीवे मारण्याची धमकी! मूकबधिर भावासाठी बहिणीची फिर्याद; वाचा, सोलापूरची गुन्हेगारी

‘शेतजमीन व इतर जागेतून हक्कसोड प्रमाणपत्रावर स्वाक्षरी कर’ म्हणून वडिलानेच मुलाला (राहुल) मारहाण केली. त्यासाठी काका व त्याच्या मुलांनीही राहुलला मारहाण केली, अशी फिर्याद अनिता प्रशांत माड्याळ (रा. बलदवा नगर, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली.
वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्त
वाचा शहरातील गुन्हेगारी वृत्तESAKAL

सोलापूर : ‘शेतजमीन व इतर जागेतून हक्कसोड प्रमाणपत्रावर स्वाक्षरी कर’ म्हणून वडिलानेच मुलाला (राहुल) मारहाण केली. त्यासाठी काका व त्याच्या मुलांनीही राहुलला मारहाण केली, अशी फिर्याद अनिता प्रशांत माड्याळ (रा. बलदवा नगर, शेळगी) यांनी जोडभावी पेठ पोलिसांत दिली.

आई व लहान भाऊ राहुल हे त्यांच्या घरी नसल्याचे पाहून शुक्रवारी (ता. १५) शेळगीतील माकणे अपार्टमेंटमधील बहिणीच्या घरी असलेल्या राहुलला तिघांनी बेदम मारहाण केली. दुपारी पावणेतीनच्या सुमारास राहुलचे वडील चनबसप्पा सिद्धप्पा माळी याने स्वत:च्याच मुलावर हात उचलला. संशयित आरोपी चनबसप्पाचा भाऊ अप्पशा माळी व त्याचा मुलगा शशिकांत माळी या तिघांनी मिळून राहुलला मारहाण केली. त्यांनी राहुलच्या हातावर, पायावर, पाठीवर, छातीवर काठीने मारहाण केली. काहीतरी त्याला फेकून मारल्याने राहुलच्या कपाळावर जखम झाली आणि त्यातून रक्त आले, असेही फिर्यादी अनिता माड्याळ यांनी पोलिसांना सांगितले. वडील, काका व चुलत भावाने मिळून घरातील प्रापंचिक साहित्याची तोडफोड देखील केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार नीलेश साळुंखे तपास करीत आहेत.

‘हक्कसोड’साठी मूकबधिर मुलाला वडिलाकडून जीवे मारण्याची धमकी

शेतजमीन व इतर जागेत तुला काहीही हक्क नको म्हणून हक्कसोड पत्रावर स्वाक्षरी कर म्हणून जन्मदात्या पित्यासह ज्याच्या अंगाखांद्यावर राहुलचे बालपण गेले, त्या काकाने तर ज्याच्यासोबत राहुल बालपणी सख्ख्या भावाप्रमाणे वावरला त्या चुलत भावाने देखील त्याला मारहाण केली. शेवटी त्यांनी राहुलला ‘स्वाक्षरी कर नाहीतर जीवे मारू’ अशी धमकी दिली. हृदयस्पर्शी प्रसंग म्हणजे मूकबधिर भावाला बोलता येत नसल्याने बहीण अनिता यांनी जोडभावी पेठ पोलिसांत फिर्याद दिली.

सोलापुरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दाखल गुन्हे....

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; तरुणावर गुन्हा दाखल

सोलापूर : शहरातील एका वसतिगृहात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याबद्दल वस्तीगृहासमोर राहणाऱ्या तरुणाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन पीडिता वस्तीगृहाच्या गेटबाहेर मैदानात खेळण्यासाठी आल्यावर तिच्याकडे वेड्यावाकडे नजरेने पाहणे व हाताने खाणाखुणा करून तिच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले. त्याचप्रमाणे तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी रशीद बाडीवाले याच्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

--------------------------------------------------------

मागील भांडणातून तरूणावर कोयत्याने वार

सोलापूर : मागील भांडणाच्या रागातून तिघांनी पृथ्वीराज गायकवाड याच्यावर धारधार कोयत्याने वार केल्याची घटना मरिआई चौकाजवळील गोल्ड जिमजवळ झाली. शुक्रवारी (ता. १५) रात्री नऊच्या सुमारास मृत्यूंजय गवळी, अमित गवळी व अश्विन साठे या तिघांनी दुचाकी अडवून पृथ्वीराजच्या मांडीवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची फिर्याद आदित्य जयवंत यमपुरे (रा. बुधवार पेठ, वडार गल्ली) यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. त्यावरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड तपास करीत आहेत. मागील काही दिवसांपासून भांडणात कोयत्याचा वापर वाढल्याचे चित्र दिसत आहे.

----------------------------------------------------

‘वालचंद’मधील प्राध्यापकास मारहाण; पण आपापसात मिटले भांडण

सोलापूर : शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील एका प्राध्यापकास मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यात भाजपचा एक नेता (पदाधिकारी) देखील दिसत आहे. पण, त्यासंबंधी जेलरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जाफर मोगल यांच्याकडे विचारपूस केली असता, ते भांडण आपापसात मिटल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, प्राध्यापकाला मारहाण करण्याचे नेमके कारण काय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

--------------------------------------------------------

दुचाकीचा फोकस चेहऱ्यावर; दोघांकडून तरूणाला मारहाण

सोलापूर : भैरू वस्ती येथे बाथरूमचे काम सुरु असल्याने बांधकामासाठी कामगार पहायला जात असताना मोदी स्मशानभूमीजवळ गेल्यावर तेथे दारू पिणाऱ्या दोघांच्या चेहऱ्यावर दुचाकीच्या हेडलाईटचा उजेड पडला. त्यातून त्या दोघांनी हाताने डोळ्यावर मारहाण करून जखमी केले, अशी फिर्याद नागराज भारत जाधव (रा. भैरू वस्ती, लिमयेवाडी) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. पोलिस हवालदार इनामदार तपास करीत आहेत.

--------------------------------------------------------

बल्कर वाहनाचे टायर अन्‌ इंधन चोरी

सोलापूर : सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील काकासाहेब पाटील यांच्या घरासमोरील सार्वजनिक रोडवर बल्कर वाहन (एमएच १२, व्हीएफ ७३५२) उभे केले होते. त्यानंतर फिर्यादी महादेव नागनाथ माळगे (रा. केगाव) हे गाडी लॉक करून घरी गेले. त्यावेळी चोरट्यांनी वाहनाचे चार टायर व ६० लिटर डिझेल चोरून नेले, अशी फिर्याद माळगे यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. ११ सप्टेंबरला रात्री आठ ते १२ सप्टेंबरच्या पहाटे तीन, यावेळेत ही चोरी झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिस हवालदार पवार तपास करीत आहेत.

---------------------------------------------------------------------------------

माहेरून दोन तोळे सोने घेऊन ये म्हणून विवाहितेला मारहाण

सोलापूर : माहेरून दोन तोळे सोन्याचे दागिने घेऊन ये म्हणून सासरच्यांनी छळ केल्याची फिर्याद निकहत सोहेल बागवान (रा. शास्त्री नगर) यांनी सदर बझार पोलिसांत दिली. त्यावरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सासरी नांदत असताना पतीसह सासू, नणंद यांनी १८ मार्च २०२२ ते २९ ऑगस्ट २०२३ या काळात सासरच्यांनी छळ केला. दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंची देखील त्यांची मागणी होती. त्या सर्वांनी मिळून शिवीगाळ, दमदाटी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मारहाण करून त्यांनी माहेरी जाण्यास भाग पाडले, असेही फिर्यादीत नमूद आहे. निकहत बागवान यांच्या फिर्यादीवरून पती सोहेल बागवान, सासू मुमताज बागवान, नणंद समरीन बागवान व सना बागवान (सर्वजण रा. जवाहर नगर, कोल्हापूर) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार इनामदार तपास करीत आहेत.

---------------------------------------------------------------------------------

माहेरून ५० लाख आण म्हणून विवाहितेचा छळ

सोलापूर : माहेरून ५० लाख रुपये आण, नाहीतर शिक्षणासाठी बॅंक लोन काढून दे म्हणून पतीसह सासरच्यांनी उपाशीपोटी ठेवून छळ केल्याची फिर्याद दिपिका गुंडू (रा. गांधी नगर, अक्कलकोट रोड) यांनी एमआयडीसी पोलिसांत दिली. फिर्यादी दिपिका यांचा नोव्हेंबर २०१९ मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून सासरच्यांनी ‘तु वांजोटी आहेस’ असे टोमणे मारून मानसिक व शारीरिक त्रास दिला. शिक्षणासाठी बॅंकेतून कर्ज काढून दे किंवा माहेरून ५० लाख रुपये आण, असा तगादा लावला. बॅंकेच्या कर्ज प्रकरणावर स्वाक्षरी न केल्यास तुझे पदवी प्रमाणपत्र जाळून टाकतो, अशी धमकी त्यांनी दिली. तसेच ५ एप्रिल २०२३ रोजी पुण्यातील मार्केट यार्ड येथील पी.एन.बी. बॅंकेतून पाच लाख ५० हजारांचे लोन काढले आणि त्यावेळी मला काहीही न सांगता त्यांनी ती रक्कम स्वत:च्या खात्यात वर्ग केली, असेही फिर्यादीत नमूद आहे. बॅंक लोन करूनही सासरच्यांनी उपाशीपोटी ठेवून छळ केल्याचेही दिपिका गुंडू यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून पती प्रसाद गुंडू, सासरा प्रमोद गुंडू, सासू वंदना गुंडू, दिर प्रणव गुंडू (सर्वजण रा. मार्केट यार्ड, पुणे) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस हवालदार श्री. गायकवाड तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com