राज्यात पावसासाठी पोषक हवामान; पुढील चार दिवस मध्यम सरींचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Environment

पुणे शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरूच आहे. अंशतः ढगाळ वातावरणासह अधून मधून उन्हाची अनुभूती होत आहे.

राज्यात पावसासाठी पोषक हवामान; पुढील चार दिवस मध्यम सरींचा अंदाज

पुणे - राज्यात पावसासाठी पोषक हवामान झाले असून, पुणे शहर व परिसरात गुरुवारी (ता. २९) पावसाच्या मध्यम सरींनी हजेरी लावली. पुढील चार दिवस शहर आणि परिसरात पावसाच्या मध्यम सरींचा अंदाज आहे. तर शुक्रवारी (ता. ३०) शहर व परिसरात ढगाळ वातावरणासह मध्यम हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरूच आहे. अंशतः ढगाळ वातावरणासह अधून मधून उन्हाची अनुभूती होत आहे. त्यात उकाडा देखील जाणवू लागला होता. गुरुवारी दिवसभर असेच चित्र कायम होते. मात्र दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह मुख्य शहरासह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली. तसेच पावसाच्या एकाद दुसऱ्या जोरदार सरींनी देखील हजेरी लावली. शहरात १७.३ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली होती. दरम्यान हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या मंगळवारपर्यंत (ता. ४) जिल्ह्यात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी अशाच राहणार आहेत.

राज्यात ही पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. तर शनिवारी (ता. ३०) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार तर, मराठवाडा आणि कोकणात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला.

गुरुवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. इगतपुरी येथे सर्वाधिक १०० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. सध्या पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असून त्यातच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरापासून दक्षिण अंतर्गत कर्नाटक पर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. यामध्ये कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची अंदाज आहे.

शुक्रवारी (ता.३०) या जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट -

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद, बीड, पुणे, धुळे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, सांगली.