Vidhan Sabha 2019 : बंडखोरीच्या भीतीमुळे युतीच्या याद्या लांबल्या

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 October 2019

युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती असली, तरी दोन्ही पक्षांमध्ये काही सदस्य नाराज असल्याचे दिसत आहे.

विधानसभा 2019
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या, तरी अद्याप शिवसेना-भाजपने युती जाहीर केली नाही. युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल अशी परिस्थिती असली, तरी दोन्ही पक्षांमध्ये काही सदस्य नाराज असल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि भाजपने अद्याप जागावाटपांची माहिती जाहीर केली नसली, तरी वडाळा मतदारसंघ हा भाजपकडे जाण्याची पूर्ण शक्‍यता आहे. यामुळे शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

श्रद्धा जाधव बंडखोरीच्या तयारीत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढण्याची शक्‍यता आहे. वडाळा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जात असल्याने श्रद्धा जाधव नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी खासदार राहुल शेवाळेंसह ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव यांची भेटदेखील घेतली आहे.

दुसरीकडे, काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले कालिदास कोळंबकर यांच्याही अडचणीत यामुळे वाढ होण्यची शक्‍यता आहे. वडाळा मतदारसंघात कोळंबकर यांचा चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असून, आतापर्यंत सात वेळा सलग निवडणूक जिंकले आहेत. हीच परिस्थिती अनेक मतदारसंघांत आहे. भाजपचीही अशीच अवस्था आहे. ग्रामीण भागातील काही मतदारसंघ शिवसेनेकडून सोडवून घेण्यासाठी मुंबईतील काही मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्याची भाजपची तयारी आहे. मात्र, येथील विद्यमान आमदार बंडखोरी करतील, या भीतीने भाजपनेही संवेदशील मतदारसंघाची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत न करण्याचे ठरविल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The fear of rebellion has prolonged the Alliance list