कुटुंब नियोजनात महिलांची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जून 2019

राज्यातील ४ वर्षांची स्थिती

  • ५२,६१५ नसबंदी केलेले पुरुष
  • १९,७४,२९८ कुटुंब नियोजन केलेल्या महिला
  • १८६.७९ कोटी नसबंदीसाठीचा खर्च
  • १६,८७,५५८ ग्रामीण महिलांची संख्या
  • ४८,७८३ शहरी महिलांची संख्या

राज्याचा प्रजनन दर १.८; चार वर्षांत २०.२६ लाख शस्त्रक्रिया
सोलापूर - राज्याच्या लोकसंख्येला आवर घालण्यासाठी कुटुंब कल्याण विभाग सरसावला असून, २०१५ पासून आतापर्यंत राज्यातील तब्बल २० लाख २६ हजार ९१३ जोडप्यांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर कमी होऊन आता तो १.८ वरती स्थिरावल्याने लोकसंख्या नियंत्रणात आल्याची माहिती राज्याच्या कुटुंब कल्याण विभागाच्या सूत्रांनी दिली.

शस्त्रक्रिया न करताही कुटुंब नियोजन करण्याची सुविधा आता शहरांबरोबरच ग्रामीण भागातही उपलब्ध झाली आहे. त्यासाठी छाया आणि अंतरा या गोळ्यांची मदत घेतली जात असून, तांबीही दर्जेदार वापरली जात आहे. मात्र, शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांनी कुटुंब नियोजनासाठी पुढाकार घेतला आहे. मागील चार वर्षांत ५२ हजार ६१५ पुरुषांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली असून, त्यामध्ये शहरी भागातील ३ हजार ८३२, तर ग्रामीण भागातील ४८ हजार ७८३ पुरुषांचा समावेश आहे. तर, दुसरीकडे शहरातील दोन लाख ८६ हजार ७४० महिलांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेतली असून, त्या तुलनेत ग्रामीण भागातील तब्बल १६ लाख ८७ हजार ५५८ महिलांनी कुटुंब नियोजन केल्याचेही कुटुंब कल्याण विभागाने सांगितले.

नागरी भागातील दोन लाख ९० हजार ५७२, तर ग्रामीण भागातील १७ लाख ३६ हजार ३४१ जोडप्यांनी कुटुंब नियोजन केले आहे. त्यामुळे राज्याचा प्रजनन दर स्थिरावला असून, लोकसंख्या नियंत्रणासाठी त्याचा मोठा फायदा झाला आहे. कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ, बुलडाणा, मुंबई व पुणे जिल्ह्याने त्यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.

राज्यातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सद्यःस्थितीत ६४ टक्‍के स्त्री-पुरुषांनी कुटुंब नियोजनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यासाठी अंतरा व छाया या गोळ्या अन्‌ दर्जेदार तांबी यांची मदत होत आहे. शस्त्रक्रियेविना कुटुंब नियोजनाकडे जोडप्यांचा कल वाढल्याने मागील तीन वर्षांत राज्याची लोकसंख्या स्थिर असल्याचे चित्र आहे.
- अर्चना पाटील, अतिरिक्‍त संचालक, कुटुंब कल्याण विभाग, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Females lead in family planning