उष्माघाताचे राज्यात 15 बळी सर्वाधिक 12 मृत्यू नागपूरमध्ये

उष्माघाताचे राज्यात 15 बळी सर्वाधिक 12 मृत्यू नागपूरमध्ये

नागपूर, हिंगोली : सुमारे आठवड्यापासून विदर्भात सुरू असलेल्या उन्हाच्या तीव्र लाटेने एकट्या नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल 12 नागरिकांचा बळी घेतला. तसेच, हिंगोली जिल्ह्यात दोन, तर अकोल्यात एकाचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. उन्हाचा तडाखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे.

नागपूरमध्ये शनिवारी शहरातील विविध भागांत उष्माघाताने चार जण मृत्युमुखी पडले. तर, रविवारी तीन जणांचा बळी घेतला. याशिवाय सोमवारी पाच जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. अकोल्यातही उन्हाचा कडाका कायम असून, तेथे एकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. परंतु, त्याची पडताळणी सुरू आहे.

हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ तालुक्‍यातील गोजेगाव येथे एका युवकाचा व वसमत तालुक्‍यातील गिरगाव येथे एका ज्येष्ठ महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाला. तसेच, राज्यात 180 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये तातडीचे उपचार सुरू आहेत. त्यामध्ये नागपूर विभागात सर्वाधिक 92, तर अकोल्यात 54 आणि लातूर जिल्ह्यातील 17 आणि पुणे विभागातील 16 जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिली. 

पारा किंचित कमी, चटके कायम 
रविवारच्या तुलनेत नागपूरच्या पाऱ्यात आज किंचित घसरण झाली असली, तरी उन्हाचे चटके कायम होते. उन्हामुळे शहरात प्रचंड उकाडा जाणवत असून, अंगातून घामाच्या धारा वाहताहेत. दुपारच्या सुमारास रस्त्यांवर शुकशुकाट आहे. उन्हाच्या तडाख्यापुढे पंखे व कूलर्सदेखील प्रभावहीन ठरत आहेत. सायंकाळी व उशिरा रात्रीपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत. 

उष्माघातावर घरगुती उपाय 
- नियमित थंड पाणी प्यावे 
- कांद्याचा रस तळपायाला लावावा 
- लिंबू-पाणी अधिकाधिक प्यावे 
- उन्हात घराबाहेर पडू नये 

उष्माघात टाळण्यासाठी 
- डोक्‍याला पांढरा रुमाल बांधून घराबाहेर पडावे 
- उन्हातून आल्यावर फ्रीजचे पाणी पिऊ नये 
- ताप असल्यास डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे 
- टरबूज, कांदा, डांगर यांचा अधिकाधिक वापर करावा 

विदर्भातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) 

शहर तापमान 
अकोला 46.9 
अमरावती 46.8 
चंद्रपूर 46.6 
वर्धा 45.8 
नागपूर 44.8 
यवतमाळ 45.5 
वाशीम 45.0 
बुलडाणा 43.5 
गोंदिया 43.0 
गडचिरोली 43.0 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com