विकासाची बिजे पेरणारी दीड दशकाची वाटचाल ! 

अभय दिवाणजी
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

"सकाळ'च्या सोलापूर आवृत्तीने पाहता पाहता पंधरा वर्षांचा टप्पा गाठला. अर्थात पंधरा वर्षे म्हणजे तसा फार मोठा काळ नाही. सोलापूरकरांची सकाळ चहाबरोबरच; "सकाळ'मधील सकारात्मक वृत्त वाचनाने होते. "सकाळ'ने सामाजिक समरसतेबरोबरच पेरलेली विकासाची बिजे आता अंकुरत आहेत हे या पंधरा वर्षांचे सिंहावलोकन केल्यास अधोरेखित होते.

"सकाळ'च्या सोलापूर आवृत्तीने पाहता पाहता पंधरा वर्षांचा टप्पा गाठला. अर्थात पंधरा वर्षे म्हणजे तसा फार मोठा काळ नाही. सोलापूरकरांची सकाळ चहाबरोबरच; "सकाळ'मधील सकारात्मक वृत्त वाचनाने होते. "सकाळ'ने सामाजिक समरसतेबरोबरच पेरलेली विकासाची बिजे आता अंकुरत आहेत हे या पंधरा वर्षांचे सिंहावलोकन केल्यास अधोरेखित होते. स्मार्ट सिटी किंवा जलयुक्त शिवारसारखा उपक्रम असेल, पीडित दुःखितांना सहकार्याचा हात असेल, गुणी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत असेल; इतकेच नव्हे तर अगदी भिकाऱ्याच्या मुलीच्या लग्नासाठीही "सकाळ'ने केलेल्या आवाहनाला मिळालेला प्रतिसाद पाहिला तर सामाजिक अभिसरणाची निश्‍चितच ती एक आदर्श पायवाटच ठरली आहे, यात शंका नाही. हे सगळे झाले ते कर्तव्यभावनेतूनच असे आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो. प्रश्‍न मांडून तटस्थ राहण्याऐवजी उत्तर शोधणाऱ्या पत्रकारितेचे हे द्योतक आहे, असे म्हणावेसे वाटते. 

दीड दशकात "सकाळ'ने सोलापूर जिल्ह्यातील यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करताना "दूरितांचे तिमिर जावो' हीच भावना मनी ठेवत वाटचाल केली आहे. केवळ बातम्यांपुरतीच पत्रकारिता मर्यादित न ठेवता समाजात सकारात्मक वातावरणाची ज्योत तेवत ठेवली आहे. विकासासाठी सतत अनेक प्रयोग करणारे वृत्तपत्र म्हणून "सकाळ'ने वाचकांच्या प्रेमावरच सर्वदूर ख्याती मिळविली आहे. "सकाळ'च्या आजपर्यंतच्या वाटचालीचे रहस्य वाचनीयतेबरोबरच "विश्‍वासार्हतेत'च दडले आहे. "सकाळ'ने सुरू केलेल्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क'च्या माध्यमातून तरुणांचे एक वेगळे व्यासपीठ निर्माण करण्यात येत आहे. तरुणांच्या कलागुणांबरोबरच अभ्यासूवृत्तीला जोड मिळावी हा या मागील उेद्‌द्‌श आहे. "सकाळ'च्या तनिष्का या महिलांसाठीच्या वेगळ्या व्यासपीठाने जिल्ह्याबरोबरच राज्यात मोठी क्रांतीच केली आहे. स्त्री प्रतिष्ठा वाढवत तनिष्कांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातील विविध 19 ठिकाणी गाळ काढल्याने त्या भागातील पाणी टंचाईवर काही प्रमाणात का होईना मात करता आली. "सकाळ रिलिफ फंडा'बरोबरच यासाठी लोकसहभाग मोठ्या प्रमाणात मिळाला याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावा लागेल. यंदा झालेल्या तनिष्कांच्या निवडणुकाही महिलांमधील खिलाडूवृत्तीचे दर्शन ठरविणाऱ्या राहिल्या. दुग्ध व्यवसाय, शेळीपालनासारख्या पारंपरिक व्यवसायाबरोबरच तनिष्कांनी विविध उद्योगांमध्येही आघाडी घेतली आहे. स्मार्ट सिटी योजनेत "सकाळ'ने दिलेल्या योगदानामुळे लोकांची मानसिकता बदलण्यास हातभार लागला. केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत सोलापूरचा समावेश तर झाला आहे. आता गरज आहे ती सोलापूरचा चेहरामोहरा पूर्ण बदलण्याची. यासाठी "सकाळ' सतत पाठपुरावा करणार हे निश्‍चित ! 

नदी प्रदूषण विरोधी जागर मोहिमेत सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरणाऱ्या भीमा व सीना या नद्यांचे प्रदूषण दूर करण्यासाठी चळवळ उभी करण्याचा प्रयत्न झाला. त्याला प्रतिसादही मिळाला. नदीकाठच्या गावांमध्ये हा जागर होत असतानाच गाळाने भरलेल्या सीना नदीतील गाळ व चिलार काढण्याचे काम लोकसहभागातून सुरू झाले. पाडळी (ता. करमाळा) येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून आपल्या परिसरातील नदी स्वच्छता मोहीम राबविली. नदी प्रदूषण विरोधी जागर ही अखंड चालणारी मोहीम असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचे चित्र बदलण्याचा एक वेगळा प्रयोगही "सकाळ'ने केला. या योजनेला प्रतिसाद म्हणून खासगी कंपनीच्या "सीएसआर'मधून जिल्ह्यातील 40 शाळा डिजीटल (ई-लर्निंग) झाल्या, हे एक मोठे यशच म्हणावे लागेल. 

"सकाळ' नेहमीच सकारात्मकतेचा पुरस्कार करते. सकारात्मकतेतून वेगळ्या दिशेने वाटचाल करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव "सकाळ'तर्फे प्रतिवर्षी वर्धापनदिनी केला जातो. "लोकसहभागातून विकास' हे ब्रीद अंगिकारतच आजपर्यंतची वाटचाल आहे. सोलापूर, अहमदनगर व उस्मानाबाद अशा तीन जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या पाडळी (ता. करमाळा) येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून गावचा चेहरामोहराच बदलला आहे. वेळापूर (ता. माळशिरस) सारख्या ग्रामीण भागात राहणाऱ्या, दोन्ही हातांनी दिव्यांग असूनही सुयश जाधव याने पॅराऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. कृष्णपरमेश्‍वर सुतार व गौरीशंकर नारायणे या महापालिका शाळेतील शिक्षकांनी जनतेचा गैरसमज दूर करीत वंचितांसाठी शैक्षणिक क्रांतीच केली आहे. रक्तदानाची चळवळ वाढवताना अशोक नावरे यांनी स्वतः तब्बल दोनशेवेळा रक्तदान केले. हिप्परगा तलावातील गाळ काढण्याची योजना आखून ती प्रत्यक्षात कृतीत आणताना अडथळ्यांच्या अनेक शर्यती पार करणाऱ्या भक्ती जाधव यांचेही कार्य अनमोल असेच आहे. 

समाजात आपल्या वेगळ्या कार्याने वाटचाल करणाऱ्या या सर्वांचा गौरव करताना पंढरपूर येथील शहीद कुणालगीर मुन्नागीर गोसावी यांचे विस्मरण कसे होईल ? नगरोटा (काश्‍मिर) येथे प्राणपणाने लढत अतिरेक्‍यांशी दोन हात करताना कुणालगीर यांना वीरमरण आले. आपली कन्या उमंगलाही सैन्यदलातच घालण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्तता करण्यासाठी गोसावी परिवार सरसावला आहे. गोसावी कुटुंबियांचा विशेष सन्मान करणे हे आमचे आद्य कर्तव्यच समजतो. वर्धापन दिनानिमित्त अशा वेगळ्या वाटेने जाऊन आपला ठसा उमटविणाऱ्या सर्वांनाच सलाम ! 

Web Title: Fifteen-year-old reached the stage of solpaur Sakal