विठ्ठल मंदिर समितीकडे तब्बल 50 लाख रुपयांची चिल्लर पडून 

भारत नागणे 
बुधवार, 10 एप्रिल 2019

विठ्ठल मंदिर समितीकडे वर्षभरापासून सुमारे 50 लाखांची चिल्लर पडून असून चिल्लरच्या साठ्यामुळे मंदिर समितीची डोकेदुखी वाढली आहे.

पंढरपूर : अनेक वेळा चिल्लरच्या पैशावरुन बाजारात आणि सार्वजनिक व्यवहारात अडचणींना सामोरे जावे लागते. तर काहीवेळा  अधिकच्या चिल्लरमुळे समस्या देखील निर्माण होते. अशाच वाढत्या चिल्लरच्या नव्या समस्येला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सध्या सामोरे जावे लागत आहे. स्थानिक बँकांनी चिल्लर घेण्यास नकार दिल्याने.... कोणी चिल्लर घेता चिल्लर अशी आर्त हाक देण्याची वेळ विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीवर आली आहे. सध्या मंदिर समितीकडे वर्षभरापासून सुमारे 50 लाखांची चिल्लर पडून असून चिल्लरच्या साठ्यामुळे मंदिर समितीची डोकेदुखी वाढली आहे. शिवाय आर्थिक नुकसान देखील सुरु आहे.

गरीबांचा देवा.. विठ्ठल आर्थिक दृष्टया अधिक समृध्द होऊ लागला आहे. विठ्ठल दर्शनासाठी देशभरातून दररोज हजारो भाविक पंढरीत येतात. दर्शनानंतर भाविक देवाला आपापल्या ऐपती प्रमाणे देवाच्या पायाजवळ दान अर्पण करतात. यामध्ये पाच रुपये, दहा रुपये, एक रुपया अशा नाण्यांचा समावेश असतो. त्याच बरोबर देणगी पेटयांमध्येही मोठ्या प्रमाणावर भाविकांकडून चिल्लरच्या स्वरुपात दान टाकले जाते.  

दररोज मंदिर समितीच्या देणगी पेट्यांमध्ये अंदाजे 14 ते 15 हजार रुपयांची चिल्लर जमा होते. जमा झालेली चिल्लर मोजून ती पोत्यामध्ये साठवून ठेवली जाते. महिन्याभराची जमा झालेली चिल्रर बँकेत जमा केली जाते. मात्र गेल्या वर्षभरापासून येथील स्थानिक बँकांनी मंदिर समितीची चिल्लर जमा करुन घेण्यास स्पष्ट नकार दिल्याने सुमारे 49 लाख 38 हजार रुपयांची चिल्लर मंदिरात  पडून आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे येथील कॅनरा बँक, सेंट्रल बँक, स्टेट बँक आदी बँकांमध्ये खाती आहेत. या बँकांकडे मंदिर समितीने वेळोवेळी पाठपुरावा करुन चिल्लर जमा करुन घ्यावी यासाठी लेखी पत्र देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र या बँकांनी मंदिर समितीची चिल्लर स्विकारण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  उलट मंदिर समितीने ठेवी रुपयात मोठी गुंतवणूक केल्यास चिल्लर जमा करुन घेण्यावर विचार करु असेही काही बँकांनी समितीला अट घातली आहे.

त्यानंतर मंदिर समितीने थेट आरबीआय बँकेकडेच चिल्लर स्विकारण्या संदर्भात पत्र व्यवहार केला आहे. आरबीआय बँकेकडून ही या संदर्भात कोणतेच उत्तर आले नाही. त्यामुळे चिल्लरची समस्या अधिकच गंभीर झाली आहे. 

गेल्या वर्षभरात मंदिर समिकडे जवळपास 50 लाख रुपयांची चिल्लर जमा झाली आहे. त्यात दररोजच्या जमा होणाऱ्या अधिकच्या चिल्लरची भर पडली आहे. मोठ्या प्रमाणावर चिल्लर साठल्यामुळे ती ठेवायची कुठे ही नवीन समस्या देखील समितीपुढे निर्माण झाली आहे. मंदिरातील चिल्लरची समस्या कशी आणि कधी सुटते याकडेच विठु भक्तांचे आणि देणगीदारांचे लक्ष लागले आहे.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला दररोज अंदाजे 15 हजार रुपयांची चिल्लर देणगीच्या स्वरुपात मिळते. मागील वर्षभरात सुमारे 50 लाख रुपयांची चिल्लर जमा झाली आहे. वेळोवेळी चिल्लर बॅकेत जमा करण्यासाठी नेले असता, बँकांनी जमा करुन घेण्यास नकार दिला आहे. .या संदर्भात संबंधीत बँकांना लेखी पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतरही बँकांनी कोणतीची तत्परता दाखवली नाही. मागील दोन महिन्यांपूर्वी आरबीआय बँकेकडेच थेट पत्रव्यवहार केला आहे. अजून कोणतेच उत्तर प्राप्त झाले नाही. सध्या चिल्लर ठेवायची कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक विठ्ठल मंदिर समिती,पंढरपूर
 

Web Title: Fifty lakh rupees coin are not in operation of Vitthal Rukhmini Temple