उमेदवारीसाठी कॉंग्रेसमध्ये "मारामारी'

congress
congress

मुंबई - कॉंग्रेसमध्ये उमेदवारीसाठी तुफान गटबाजी सुरू असल्याने संसदीय मंडळाच्या बैठकीत अक्षरश: मारामारीची वेळ आली होती. नागपूरमध्ये दिग्गज नेत्यांच्या आग्रहाला शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी सतत आक्षेप घेतल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रसंग बेतला. यामुळे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचीही पंचाईत झाली.

पुण्यामध्ये कॉंग्रेसचे नेते रमेश बागवे यांच्या प्रभागावरच राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केल्याने आघाडीत काडीमोड घेण्याचा निर्णय कॉंग्रेस नेत्यांनी घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिकमध्ये मात्र आघाडीवर शिक्‍कामोर्तब झाले असून, पिंपरी- चिंचवडमध्ये अजूनही आघाडीची शक्‍यता असल्याचा दावा केला जात आहे. टिळक भवनमध्ये कॉंग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक दोन दिवस सुरू आहे. यात उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असून, उमेदवारी मिळावी यासाठी गटबाजी व कुरघोडीच्या घटना घडत आहेत. मंगळवारी (ता. 31) रात्री अडीचपर्यंत सुरू असलेल्या या बैठकीत नागपूरच्या नेत्यांनी कहरच केला. सतीश चतुर्वेदी, विलास मुत्तेमवार, नितीन राऊत व अनिस अहमद यांच्यातील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर आली. शहराध्यक्ष विकास ठाकरे व प्रफुल्ल गुड्डे या दोघांमध्ये तुंबळ शाब्दिक चकमक उडाली. चारही नेत्यांनी सुचविलेल्या उमेदवारांपैकी दुसराच उमेदवार पुढे करीत ठाकरे यांनी वेगळीच भूमिका घेत शह देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी करू नये, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम यांनी घेतली होती. मात्र राष्ट्रवादीने दावा केलेल्या जागा वाटप सूत्राचे आयतेच निमित्त त्यांना मिळाले. रमेश बागवे यांच्या चिरंजीव ज्या प्रभागातून इच्छुक आहेत त्यावरच "राष्ट्रवादी'ने दावा केल्याने आघाडीत बिघाडी झाली आहे, असे सांगण्यात आले. नाशिकमध्ये मात्र आघाडीची बोलणी अंतिम झाली असून, गुरुवारपर्यंत (ता. 2) अधिकृत घोषणा होण्याची शक्‍यता आहे.

जिल्हा परिषदेसाठी आघाडीची शक्‍यता
राज्यात स्थानिक पातळीवरच आघाडीचा निर्णय घ्यावा, असे धोरण ठरल्यानंतर किमान आठ ते दहा जिल्हा परिषदांत आघाडीची शक्‍यता आहे. यामध्ये लातूर, बीड, हिंगोली, कोल्हापूर व सोलापूरच्या आघाडीबाबत तोडगा निघाल्याचे सूत्रांनी सांगितले. उद्यापर्यंत याबाबतची अधिकृत घोषणा होईल, असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com