निकृष्ट बियाणे पुरविणाऱ्या  कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील कृषी सेवा केंद्रचालकांकडून सोयाबीन, बाजरी, कापूस यांसारख्या पिकांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली होती.

नगर, ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन, बाजरी बियाण्यांची पेरणी केली; मात्र बियाणे निकृष्ट निघाल्याने उगवणच झाली नाही. या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून बोगस बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, संबंधित कंपन्यांकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे करण्यात आली आहे. 

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की सध्या खरीप हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपापल्या भागातील कृषी सेवा केंद्रचालकांकडून सोयाबीन, बाजरी, कापूस यांसारख्या पिकांचे बियाणे खरेदी करून पेरणी केली होती.

पेरणी होऊन 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला, तरी पिकांची उगवण झाली नाही. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठी फसवणूक झाली असून, त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड बसला आहे. त्यामुळे बियाणेविक्रेत्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पैसे वसूल करावेत.

योग्य कारवाई न झाल्यास 10 जुलैला आयुक्त कार्यालयात आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. अहमदनगर

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: File lawsuits against companies that supply substandard seeds