चित्रपट महामंडळाच्या भरारी पथकांचा ठगांना चाप 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

करिअरसाठी चंदेरी दुनियेचे अन्‌ छोट्या पडद्याचे कमालीचे आकर्षण तरुणाईमध्ये कायम आहे. याच आकर्षणातून कधी चित्रीकरणाच्या, तर कधी ऑडिशनच्या नावाखाली फसवणुकीचा राजरोज व्यवसाय चालतो. त्यावर उपाय म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने भरारी पथके तैनात केली असून, पथकांच्या माध्यमातून ठगांना चाप लावला जातोय. वर्षभरात किमान पन्नास जणांच्या मुसक्‍या आवळल्या जात असल्याचे चित्र आहे. 

नाशिक : करिअरसाठी चंदेरी दुनियेचे अन्‌ छोट्या पडद्याचे कमालीचे आकर्षण तरुणाईमध्ये कायम आहे. याच आकर्षणातून कधी चित्रीकरणाच्या, तर कधी ऑडिशनच्या नावाखाली फसवणुकीचा राजरोज व्यवसाय चालतो. त्यावर उपाय म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने भरारी पथके तैनात केली असून, पथकांच्या माध्यमातून ठगांना चाप लावला जातोय. वर्षभरात किमान पन्नास जणांच्या मुसक्‍या आवळल्या जात असल्याचे चित्र आहे. 

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या नाशिक नगरीमध्ये ठगांच्या धंद्यांचा पर्दाफाश झाल्याने महामंडळाने भरारी पथकांचा विस्तार केला. भरारी पथकाने नाशिकमधील "अप्सरा-2017' हा कार्यक्रम बंद पाडला. कार्यक्रमात काम करणाऱ्या मुलीची तक्रार आल्यावर त्या तक्रारीची शहानिशा करण्यात आली; मग पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापाठोपाठ सिन्नरमध्ये एका बोगस चित्रपटाचे ऑडिशन पथकाने बंद पाडले. दादासाहेब फाळके स्मारकातून पळालेल्या एका बोगस निर्मात्यालाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात पथकाने यश मिळवले आहे. गेल्या काही वर्षांपासून मालिका, चित्रपट, लघुपटाचे प्रमाण वाढले. त्यामुळे या क्षेत्रात गैरप्रकार व फसवणूकही वाढत आहेत. महामंडळाच्या सभासदांना काम न देणे, कलाकार व तंत्रज्ञ यांना कामाचे दाम न देणे, नवोदितांकडून पैसे उकळणे, इतर अनेक मार्गांनी फसवणूक करणे अशा प्रकारांनी डोकेवर काढले. त्यावर उपाय म्हणून महामंडळाने भरारी पथके तयार केली. 

Web Title: Filmmaker's strike squad