मोठी ब्रेकिंग! अंतिम वर्षाची परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून; घरबसल्या परीक्षेचे 'असे' केले नियोजन

तात्या लांडगे
Wednesday, 2 September 2020

ठळक बाबी...

 • ऑनलाइन आणि ऑफलाइन घेतली जाणार परीक्षा
 • ऑनलाईनसाठी रियल टाईम प्रॉक्‍टरिंगची पध्दत अवलंबणार
 • 5 ऑक्‍टोबरपासून घरबसल्या विद्यार्थ्यांची सुरु होणार परीक्षा
 • प्रश्‍नसंच तयार करुन बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका निश्‍चितीची युध्दपातळीवर तयारी
 • विद्यापीठ घेणार महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाची मदत
 • नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरु करुन आगामी सत्राची परीक्षा जानेवारीत घेण्याचे नियोजन

  सोलापूर : राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांशी संलग्नित साडेपाच हजार महाविद्यालयांतील सुमारे साडेसात लाख विद्यार्थ्यांपैकी चार ते पाच लाख विद्यार्थ्यांकडे ऑनलाईनची साधने उपलब्ध आहेत. त्यांची घरबसल्या ऑनलाइन तर ज्यांच्याकडे ऑनलाईनची साधने नाहीत, त्यांची ऑफलाइन परीक्षा घेण्याचे नियोजन झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका दिली जाईल. परंतु, प्रत्येकाची प्रश्‍नपत्रिका वेगवेगळी असणार आहे. 5 ऑक्‍टोबरपासून परीक्षेला सुरुवात होईल, अशी माहिती पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्रेणिक शाहा यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.

  ऑनलाइन परीक्षा घेताना रियल टाईम प्रॉक्‍टरिंग पध्दत अवलंबली जाणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवला जाईल. दुसरीकडे ऑफलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर विद्यापीठाचे पर्यवेक्षक व तेथील स्थानिक प्रशासनातील कर्मचाऱ्यांची नजर राहणार आहे. तत्पूर्वी, महाराष्ट्रातील कोरोनाची स्थिती अद्यापही सुधारलेली नसल्याने विद्यार्थ्यांना आता घरबसल्या परीक्षा देण्याची सोय उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिल्या आहेत. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यस्तरीय समितीने केलेले परीक्षेचे नियोजन बुधवारी (ता. 2) उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे सुपूर्द केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने व मूळगावी परतलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून असा निर्णय घेतल्याचेही त्यांनी यावेळी राज्यपालांना सांगितले.

  ठळक बाबी...

  • ऑनलाइन आणि ऑफलाइन घेतली जाणार परीक्षा
  • ऑनलाईनसाठी रियल टाईम प्रॉक्‍टरिंगची पध्दत अवलंबणार
  • 5 ऑक्‍टोबरपासून घरबसल्या विद्यार्थ्यांची सुरु होणार परीक्षा
  • प्रश्‍नसंच तयार करुन बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका निश्‍चितीची युध्दपातळीवर तयारी
  • विद्यापीठ घेणार महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत प्रशासनाची मदत
  • नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरु करुन आगामी सत्राची परीक्षा जानेवारीत घेण्याचे नियोजन

  नोव्हेंबरपासून सुरु होईल प्रवेश प्रक्रिया
  कोरोनामुळे विस्कळीत झालेले शैक्षणिक वर्ष पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा 5 ऑक्‍टोबरपासून घेतली जाईल. त्यानंतर नोव्हेंबरपासून प्रवेश प्रक्रिया सुरु करुन आगामी सत्राची परीक्षा जानेवारीत घेण्याचे नियोजन आहे. ऑनलाइन व ऑफलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देण्याच्या दृष्टीने विद्यापीठाकडून युध्दपातळीवर नियोजन केले जात आहे.
  - श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

   

  नेट कनेक्‍टिव्हीटी तथा तांत्रिक अडथळा आल्यास....
  अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षेचे वेळापत्रक व प्रवेश पत्र त्यांच्या ई-मेलवर पाठविले जाणार आहे. प्रत्येक विद्यापीठाची परीक्षेची तारीख वेगवेगळी असली, तरीही 10 ऑक्‍टोबरपासून परीक्षा घेऊन ऑक्‍टोबरअखेर निकाल लावण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी केली आहे. विद्यापीठांच्या वेबसाईटवरही वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे. घरबसल्या परीक्षा घेतली जाणार असली, तरीही त्यांना परीक्षा क्रमांकानुसारच परीक्षा द्यावी लागणार आहे. जेणेकरुन निकालास विलंब लागणार नाही तथा अडचणी येणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांना बहुपर्यायी उत्तरपत्रिका सोडविताना तांत्रिक अडचण आल्यास तथा नेट कनेक्‍टिव्हिटी गेल्यास त्यांनी सोडविलेली उत्तरपत्रिका आपोआप सेव्ह होणार आहे. अडथळा दूर झाल्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला पुन्हा पूर्वीपासून नव्हे तर, जिथपर्यंत पेपर सोडविला आहे, तिथून पुढे उत्तरपत्रिका सोडवावी लागणार आहे. जेणेकरुन विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येणार नाही, असेही विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले.


  स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
  Web Title: Final year exams from 5th October, University will be assisted by Municipal Corporation, Municipal Council, Gram Panchayat administration