अखेर ठरलं! सोलापूर-स्वारगेट ई-बससेवा उद्यापासूनच; तुम्हाला प्रवास करायचायं का? जाणून घ्या‌ तिकीट दर, बसच्या वेळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

solapur e-bus
अखेर ठरलं! सोलापूर-स्वारगेट ई-बससेवा उद्यापासूनच; तुम्हाला प्रवास करायचायं का? जाणून घ्या‌ तिकीट दर, बसच्या वेळा

अखेर ठरलं! सोलापूर-स्वारगेट ई-बससेवा उद्यापासूनच; तुम्हाला प्रवास करायचायं का? जाणून घ्या‌ तिकीट दर, बसच्या वेळा

सोलापूर : प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन महामंडळाने यापूर्वी राज्यातील बहुतेक विभागांमध्ये ई-बससेवा सुरु केली आहे. आता सोलापूर ते स्वारगेट या मार्गावर उद्यापासून (शनिवार) पहिली ई-बससेवा सुरु होणार आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी वातानुकुलीत पर्यावरणपूरक शिवाई इलेक्ट्रिक बस सोलापूर विभागात दाखल झाली आहे. यासंदर्भात सातत्याने ‘सकाळ’ने पाठपुरावा केला होता. शनिवारी (ता. २३) विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता या बससेवेला प्रारंभ होणार आहे.

पहिल्या टप्प्यात सोलापूर ते स्वारगेट या मार्गावर पाच बस धावणार आहेत. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने बसगाड्यांची संख्या वाढविली जाणार आहे. शिवाई ई- बसगाडीचा तिकीट दर हा ५४५ रुपये इतका असणार आहे. तर अर्धे तिकीट २८५ रुपये ठेवण्यात आले आहे. महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सवलत देखील असणार आहे. दुसरीकडे ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मात्र या सुसज्ज बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. प्रवाशांनी या नवीन बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक विनोद भालेराव यांनी केले आहे.

प्रवाशांसाठी आरमदायी शिवाई बस...

बसची लांबी १२ मीटर असून त्यात एकूण ४३ आसने आहेत. ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत ही गाडी प्रतितास ८० कि.मी. वेगाने धावणार आहे. बॅटरी क्षमता ३२२ के.व्ही. असून प्रवाशांकरिता गाडीत टीव्ही व प्रत्येक थांब्याची माहिती देण्यासाठी इलेक्ट्रिक लाइट फलक आहे. तसेच त्यात मोबाइल चार्जिंग, रीडिंग लॅम्प व एलईडी बल्ब आहेत.

टप्प्याटप्प्याने दहा बसगाड्या सुरु होतील

सोलापूर आगारात पाच शिवाई इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. सोलापूर ते स्वारगेट या मार्गावर उद्यापासून (शनिवारी) बसगाड्या धावणार आहेत. या मार्गावरून टप्प्याटप्प्याने एकूण १० बस धावणार आहेत. अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेली ही बस सुसज्ज असून प्रवाशांना त्यातून आरामदायी व जलद प्रवास करता येणार आहे.

- विकास पोफळे, स्थानक प्रमुख, सोलापूर आगार

ई-बसगाडीच्या अशा असतील वेळा

नवीन शिवाई ई-बसगाडी सोलापूरहून पहाटे पाच वाजता स्वारगेटला रवाना होईल. तर स्वारगेटहून सोलापूरला धावणारी बस पहाटे साडेपाचला तेथून निघेल. सोलापूर बस स्टॅण्डवरून पहाटे पाचपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि दुपारी चार ते आठ वाजेपर्यंत प्रत्येक तासाला ही बस स्वारगेटला जाणार आहे. तर स्वारगेटहून सोलापूरला येणाऱ्या बसगाड्या पहाटे साडेपाच ते सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत आणि त्यानंतर दुपारी साडेतीन ते रात्री साडेसात वाजेपर्यंत धावतील.