घाण करणाऱ्यांना आर्थिक दंडाचा तडाखा! 

fine for garbage disposers
fine for garbage disposers

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी घाण, कचरा करणाऱ्या व्यक्‍ती अथवा संस्था यांना आर्थिक दंड करण्याचा फतवा नगरविकास विभागाने काढला आहे. या फतव्याची अंमलबजावणी राज्यातील सर्व महापालिका करणार आहेत. यामुळे स्वच्छता अभियानास चालना मिळणार आहे, असे नगरविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

केंद्र शासनाच्या "स्वच्छ भारत अभियाना'च्या धर्तीवर राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियाना'ची अंमलबजावणी सुरू आहे. या अभियानात स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना ती उपलब्ध करून देत शहरे हगणदारीमुक्‍त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, शहरातील घनकचरा व्यवस्थापन करून शहर स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. यामुळे 1 ऑक्‍टोबर 2017 रोजी राज्याचा संपूर्ण नागरी भाग हगणदारीमुक्‍त झाल्याचे सरकारने घोषित केले आहे. 

त्याचबरोबर 1 मे 2017 पासून राज्यातील प्रत्येक शहरांमध्ये "कचरा लाख मोलाचा' या अंतर्गत निर्मितीच्या जागीच "ओला आणि सुका' असे कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन कायदा-2016 मधील तरतुदींनुसार महानगरपालिका क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे आपले शहर स्वच्छ ठेवणे हे कर्तव्य आहे. जे नागरिक अथवा संस्था, संघटना शहरे स्वच्छ ठेवत नाहीत, त्यांना दंड करण्याचा अधिकार असणार आहे. यामुळे राज्यातील सर्व श्रेणीच्या महानगरपालिका दंड आकारू शकणार आहेत. राज्यात 26 महानगरपालिका आहेत. यापुढे जाऊन नगरपालिका, नगर परिषदा या क्षेत्रांतही आर्थिक दंड लवकरच लागू करणार असल्याचे सूत्रांनी सागितले. 

असा होणार दंड (रुपये) 
प्रकार----- महानगरपालिका-----क, ड, वर्ग महानगरपालिका 
- रस्ते, मार्गावर घाण करणे : 180 ------ 150 
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे : 150 ----- 100 
- उघड्यावर लघवी करणे : 200 ----- 100 
- उघड्यावर शौच करणे : 500 ---- 500 
 
- राज्यातील 250 नगरपालिकांत घनकचरा व्यवस्थापनास सुरवात 
- एक व्यक्‍ती दरदिवशी 250 ते 300 ग्रॅम कचऱ्याची निर्मिती करते 
- मुंबईत दररोज 10 हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com