आता हेल्मेट नसेल तर होणाऱ्या दंडात वाढ

टीम ई-सकाळ
मंगळवार, 25 जून 2019

- हेल्मेट नसेल तर होणार दुप्पट दंड.

- आणखी कडक होईल कायदेशीर कारवाई.

मुंबई : वाहतूक नियमांच्या उल्लंघनाबद्दल दंडाची तरतूद काही पट वाढविण्याचे प्रस्तावित आहे. विरोधकांचा यास आक्षेप असल्याने हे विधेयक राज्यसभेत रखडले होते. मात्र, त्यास मंजुरी मिळण्यासाठी मोदी सरकारने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. ज्यांनी या वाहतूक नियमांची अंमलबजावणी करायची आहे, त्यांनीच त्याचे पालन केले नाही तर या दंडाची रक्कम दुप्पट होणार आहे. 

यातील काही ठळक तरतुदींनुसार रुग्णवाहिकांना मार्ग मोकळा करून न दिल्यास तब्बल दहा हजार रुपयांचा दंड प्रस्तावित करण्यात आला आहे. तसेच ड्रायव्हिंग लायसन्स रद्द झाल्यानंतर वाहन चालविल्यास दहा हजारांचा दंड होऊ शकतो. 18 वर्षांखालील मुलाने वाहन चालविणे, वेग मर्य़ादा तोडणे, दारू पिऊन वाहन चालविणे, ओव्हरलोड या सर्व बाबींसाठी मोठा दंड यानुसार भरावा लागू शकतो. 

वेगमर्य़ादा तोडणाऱ्यांसाठी एक ते दोन हजार रूपये दंड प्रस्तावित आहे. विनाविमा वाहनासाठी दोन हजार, विना हेल्मेटसाठी एक हजार रूपये आणि तीन महिने लायसन्स निलंबित करणे, अशा दोन्ही शिफारशी केल्या आहेत. 18 वर्षे पूर्ण होण्याच्या आधी वाहन चालविणाऱ्या युवकांकडून अपघात झाल्यास त्याबद्दल पालकांना जबाबदार धरले जाणार आहे.

तसेच त्यासाठी 25 हजार रूपये दंडाची आणि तीन महिने शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनाबद्दल आता शंभर रूपयांऐवजी पाचशे रूपयांचा दंड करण्यात येईल. दारू पिऊन वाहन चालविल्याबद्दल दहा हजार रूपयांचा दंड प्रस्तावित आहे. ओव्हरस्पिडींगसाठी वीस हजार रूपये भरावे लागतील.

वाहतुकीच्या नियमांच्या उल्लंघनासाठी विविध तरतुदींखाली एकूण एक लाख रूपयांचा दंड आकारण्यास यात मुभा देण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fine will be Double For Not Using Helmet