चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या विरोधातील गुन्हा रद्द

औरंगाबाद : कथा चोरून त्यावर चित्रपटाची निर्मिती केल्याच्या आरोपात न्यायालयामार्फत 'प्रोसेस इश्यू' झालेले चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविरोधात दाखल गुन्हा न्यायालयाने रद्द केला. 

शहरातील कथा लेखक मुश्ताक मोसीन मुबारक हुसैन सिद्दिकी यांनी १९८३ मध्ये 'श्रीमती' या नावाने एक चित्रपट कथा लिहिली होती. या कथेचे त्यांनी फिल्म रायटर असोसिएशनमध्ये रजिस्ट्रेशन केले होते. दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांना त्यांनी ही कथा सांगितलेली होती. त्यावर चित्रपटही होणे अपेक्षित होते. मात्र, २० जुलै २००९ मध्ये त्यांनी शहरातील चित्रपटगृहात 'पेईंग गेस्ट' हा चित्रपट पाहिला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, हा चित्रपट 'श्रीमती'ची कथा चोरून केलेला आहे. मुश्ताक मोसीन यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली. प्राथमिक सुनावणी होऊन त्यात 'पेईंग गेस्ट'चे निर्माते दिग्दर्शक सुभाष घई यांच्या विरोधात प्रोसेस इश्यू करण्याचे आदेश देण्यात आले होते. 

या प्रकरणात 11 एप्रिल रोजी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान ऍड. सागर लड्डा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, मुश्ताक यांनी जरी 8 नोव्हेंबर 1983 रोजी फिल्म रायटर असोसिएशनकडे रजिस्ट्रेशन केले असले तरी, कॉपीराइट ऍक्टखाली त्यांच्या कथेची कुठेही नोंद केलेली नाही. तसेच कथा नोंद केल्याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत आणि कॉपीराइट ऍक्टखाली गुन्हा सिद्ध करण्यासाठी त्या ऍक्टनुसार कथेची नोंद असणे अवश्यक असल्याचे अधिकृत प्रमाणपत्रही नाही. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मुश्ताक याची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. 

तसेच संबंधित कथा ही मुश्ताक यांची असल्याचे ते सिद्ध करू शकत नाहीत. याउलट ही कथा प्रकाश मेहता फिल्म रायटर यांच्याकडून कराराद्वारे विकत घेतली. त्यामुळे मुश्ताक यांचे म्हणणे ग्राह्य धरता येणार नाही, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी घई यांच्याविरोधतील दखल घेतलेला गुन्हा रद्द केला. घई यांच्यातर्फे सागर लड्डा, संदीप लड्डा, आणि सोनाली लड्डा यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com