मॉडेल फोर्ट योजनेमध्ये शिवनेरीचा अधिकार पहिला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

जुन्नर/ ओझर - केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शिवकालीन पाच किल्ले ‘मॉडेल फोर्ट’ करण्यात येणार आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीचा अधिकार पहिला असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे रविवार केले.

जुन्नर/ ओझर - केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शिवकालीन पाच किल्ले ‘मॉडेल फोर्ट’ करण्यात येणार आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीचा अधिकार पहिला असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे रविवार केले.

किल्ले शिवनेरीवर सकाळी दहाला मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार संभाजी राजे भोसले, शिवस्मारक समितीचे आमदार विनायक मेटे, आमदार शरद सोनवणे, विभागीय आयुक्‍त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलिस अधीक्षक जय जाधव, तसेच शिवप्रेमींच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. 

शिवजन्मस्थानी ऊर्मिला बुट्टे व महिलांनी मान्यवरांच्या उपस्थितीत पाळणा म्हटला. सुंठवडावाटप करण्यात आले. राजूर-तेजूर (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम व ढोल पथकाने मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रम सादर करण्यात आला. शिवकुंज येथील बाल शिवाजी व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित अभिवादन सभेत फडणवीस बोलत होते. मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, स्वागताध्यक्ष राजेंद्र कुंजीर, कार्याध्यक्ष विठ्ठल जाधव, ॲड. राजेंद्र बुट्टे, सुनील ढोबळे आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गड किल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय पुरातत्त्व विभागाला दिले आहेत. शिवकालीन किल्ले हा आपला वारसा आहे, तो जपण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. रायगड किल्ल्याचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. ही कामे लवकरच सुरू करण्यात येतील. परकीय सत्तेपासून सर्वसामान्य जनतेचे रक्षण करून स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली. त्यांच्या राज्यकारभाराची प्रेरणा घेऊन व त्यांच्याच आशीर्वादाने राज्य सरकार काम करत आहे.’’ 

खासदार संभाजी महाराज म्हणाले, ‘‘गड किल्ल्यांचे संवर्धन हे माझ्या जीवनाचे अंतिम साध्य आहे. सरकारने पाच किल्ले मॉडेल फोर्ट करावेत यासाठी मी प्रयत्नशील असून, या कामाचा पाठपुरावा करणार आहे.’’ मराठा आरक्षणाच्या विषयाकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. 

आमदार सोनवणे यांनी शिवनेरीला निधी कमी पडता कामा नये असे सांगून, रायगड महोत्सवाप्रमाणे शिवनेरी महोत्सव सुरू करत असल्याचे सांगितले. बैलगाडा शर्यतीकडे लक्ष वेधताना मी जाहीर केल्याप्रमाणे  मुख्यमंत्र्यांकडे आज राजीनामा देत आहे, असे सोनवणे यांनी सांगितले. मात्र, तुमचा राजीनामा स्वीकारणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी लगेचच स्पष्ट केले. मराठा सेवा संघाच्या वतीने क्रीडा पत्रकार प्रल्हाद सावंत यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राजेंद्र कुंजीर यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन कैलास वालगुडे यांनी केले. सदाशिव राजीवडे यांनी आभार मानले.

राज्याच्या विविध भागांतून आलेल्या शिवभक्‍तांनी शिवनेरी किल्ला गजबजून गेला होता, तर दोन दिवसांपासून विविध ठिकाणांहून शिवज्योत घेऊन जाण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने गडावर येत होते. शहरातील विविध संघटनांनी त्यांच्यासाठी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपूर्ण रात्रभर चहापाणी, तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था केली होती.

Web Title: The first model of the fort Shivneri plan