First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास? | First state transport bus run on pune nagar road on 1 june 1948 know the history | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST Bus News
First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

First ST Bus : आजच्याच दिवशी धावली होती पहिली 'लालपरी'; कशी, कुठे...काय आहे इतिहास?

आज १ जून. आजच्याच दिवशी १९४८ साली राज्य परिवहन मंडळाची पहिली गाडी अर्थात पहिली लालपरी धावली. या लालपरीचा मार्ग पुणे नगर असा होता. या घटनेला आता ७३ वर्षे पूर्ण झाली आहे. लोकांनी सोशल मीडियावर फोटो टाकले असून आपल्या आठवणी जागवल्या आहेत.

तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते या पहिल्या बसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता. या एसटीचा पहिला थांबा शिरूर होता. शिरुरमधल्याच दत्तोबा पवार यांनी ही पहिली बस चालवली होती. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं. आजही शिरुरमध्ये एसटीमध्ये काम केलेले काही जुने कर्मचारी आहेत.

कशी होती पहिली बस?

पुणे - अहमदनगर या मार्गावर राज्यातली पहिली एसटी धावली. लाकडी बॉडी आणि बाजूने कापडी कव्हर या एसटीला लावण्यात आलं होतं. त्यानंतर भाषिक आधारावर राज्याची पुनर्रचना झाली. मुंबई , मध्यप्रांत आणि निझाम राज्याचा भाग असं मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या भागातल्या वाहतूक सेवा आणि राज्यातली सेवा, हे सगळं एकत्र करून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना करण्यात आली.

मुंबईत या महामंडळाची तीन आगारे आहेत - मुंबई सेंट्रल, परळ आणि कुर्ला. कुर्ला हे आगार इतर दोघांच्या तुलनेत मोठं आहे. पण मुंबई सेंट्रल हे डेपो असलेलं आगार सगळ्यात मोठं मानलं जातं. हा डेपो सर्वात जुना आणि पहिला डेपो मानला जातो. पश्चिम रेल्वे स्टेशन समोरचा हा डेपो म्हणजेच महामंडळाचं मुख्यालय होय.

हळूहळू बसेसची संख्या वाढू लागली. त्यामुळे नंतर परेल (६०च्या दरम्यान) आणि कुर्ला डेपोची निर्मिती झाली.