पाच आणि दहा रुपयांची नाणी कायम राहणार

कैलास रेडीज
रविवार, 21 मे 2017

मुंबई - पाच आणि दहा रुपयांपासून सर्वच नाणी चलनात कायम राहणार आहेत. व्यापारी आणि बॅंकांनी नाणी स्वीकारावीत, अशा सूचना रिझर्व्ह बॅंकेने शनिवारी दिल्या. पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाणी बंद होणार, या अफवांमुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांकडून नाणी स्वीकारली जात नाहीत. त्या संदर्भात रिझर्व्ह बॅंकेशी संपर्क साधला असता बॅंकेने नाणी कायम असल्याचे स्पष्ट केले.

दहा रुपयाचे नाणे बंद होणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नाणी बाजारात स्वीकारली जात नाहीत. नागरिकांनी 5 आणि 10 रुपयांची नाणी बॅंकांमध्ये जमा करण्यासाठी धाव घेतली आहे. मात्र 10 रुपयांचे नाणे बंद करण्याचा कोणताही विचार नाही, नाणी चलनात यापुढेही कायम राहतील, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. शिवाय स्थानिक बॅंकांनी नाणी स्वीकारावीत, असे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे. बॅंकांनी नाणी स्वीकारण्यास नकार दिला तर बॅंकिंग लोकपालाकडे नागरिकांना तक्रार करता येईल. येथे ऑनलाइन तक्रार करता येते.

दरम्यान नोटांबंदीच्या काळातही नाणी बंद होणार अशा अफवा पसरल्या होत्या, त्या वेळी 10 रुपयाचे नाणे चलनात कायम असल्याबद्दल अध्यादेश आरबीआयकडून जारी करण्यात आला होता.

इथे करता येईल बॅंकांविषयी तक्रार -
बॅंकिंग लोकपाल, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया, 4 था मजला , रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया भायखळा कार्यालय इमारत, भायखळा, मुबई 400008, फोन 022 23022028

Web Title: five & ten rupees coin continue