FlashBack 2019: वाचा; नेते आणि त्यांचा या वर्षी गाजलेला डायलॉग

टीम ई-सकाळ
रविवार, 29 डिसेंबर 2019

राजकारणात काहीही घडू शकतं, याचा प्रत्ययच जणू, या वर्षी आपल्याला आला. या सगळ्यात नेते आणि त्यांची भाषणं, डायलॉग प्रचंड चर्चेत आले.

फ्लॅशबॅक 2019 : मावळत्या वर्षात देशानं आणि महाराष्ट्रानं राजकारणात खूप मोठे बदल पाहिले. नाही नाही म्हणता, केंद्रात भाजप स्पष्ट बहुमतानं सत्तेवर आला. तर शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. राजकारणात काहीही घडू शकतं, याचा प्रत्ययच जणू, या वर्षी आपल्याला आला. या सगळ्यात नेते आणि त्यांची भाषणं, डायलॉग प्रचंड चर्चेत आले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Image result for sharad pawar

शरद पवार - 'अजून बऱ्याच जणांना घरी पाठवायचंय'
महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक गाजवली ती, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मॅरेथॉनसभा सभा घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांची साताऱ्यातली पावसात झालेली सभा निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरली. या सभेपूर्वीही त्यांनी निवडणुकीत त्यांच्या वयाचा विषय चर्चेत आला होता. एका सभेत शरद पवार यांनी वयाच्या मुद्द्याला बगल देताना, 'अजून बऱ्याच जणांना घरी पाठवायचंय', असं बोलून खळबळ उडवली होती. अर्थात, त्यांच्या या वक्तव्याप्रमाणं त्यांनी अनेकांचा पराभवही करून दाखवला.

Image result for devendra fadnavis

देवेंद्र फडणवीस - 'मी पुन्हा येईन'
विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन या वक्तव्याची खूपच चर्चा झाली. त्यांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्यांची टरही उडवण्यात आली होती. शिवसेनेसोबतच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळूनही देवेंद्र फडणवीस यांना विरोधात बसावं लागलं. विरोधीपक्ष नेते झाल्यानंतरही सभागृहातही सत्ताधारी नेत्यांनी मी पुन्हा येईन, वरून फडणवीस यांची टर उडवली, पण, 'मी पुन्हा येईन म्हणालो. पण, कधी ते नाही सांगितलं', असं म्हणत, फडवणीस यांनी सारवासारव केली. 

Image result for raj thackeray

राज ठाकरे - लाव रे तो व्हिडिओ
लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात न उतरवता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मैदान मारलं. त्यांच्या सभा केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजल्या. दिल्लीतील काही ज्येष्ठ पत्रकारांनी महाराष्ट्रात येऊन त्यांची विशेष मुलाखत घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे जुने व्हिडिओ, जुन्या भूमिका, वक्तव्य सभेच्या माध्यमातून मांडत, राज ठाकरे यांनी अक्षरशः धुरळा उडवला. या सभांमध्ये त्यांचा, ' लाव रे तो व्हिडिओ' हा डायलॉग खूपच चर्चेत आला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत त्यांनी पुण्यातील एका जाहीर सभेत, कोल्हापूरचा एक मंत्री पुराच्या पाण्यातून पुण्यापर्यंत पुण्यापर्यंत वाहत आला, असा डायलॉग मारला होता, त्याचीही निवडणुकीत खूपच चर्चा झाली होती. राज ठाकरे यांनीच विधानसभा निवडणुकीत 'मला सक्षम विरोधीपक्ष नेता द्यायचाय,' अशी मागणी करून, लक्ष वेधले होते.

Image result for dhananjay munde esakal

धनंजय मुंडे - 'हे जगच सोडून जावं वाटतंय'
विधानसभा निवडणुकीत परळीची लढत खूपच गाजली. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्यातील हा सामना खूपच रंगला. मतदानाच्या आधी दोन दिवस, धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात धनंजय मुंडे यांनी पंकजा यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरल्याचं दिसत होतं. पण, मोड तोड केलेल्या या क्लिपमुळे धनंजय मुंडे अस्वस्थ झाले होते. त्यांनी या अस्वस्थतेतूनच पत्रकार परिषदेत 'हे जगच सोडून जावं वाटतंय', असं धक्कादायक विधान केलं होतं.

Image result for udhav thakre esakal

उद्धव ठाकरे - 'तुमच्यामुळं मला इथं यावं लागलं'
महाराष्ट्रात नाट्यमय घडामोडींनंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. परंतु, सभागृहात भाषण करताना, त्यांनी मी पुन्हा येईन, या डायलॉगवरून देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला आहे. 'मी पुन्हा येईन, असं म्हणालो नव्हतो. पण, मला इथं यावं लागलं. तुमच्यामुळं मला इथं यावं लागलं नाही तर, मी हा कार्यक्रम घरी बसून टीव्हीवर बघत बसलो असतो', असा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. 

Image result for ajit pawar esakal

अजित पवार - 'बघतोच कसा निवडून येतो'
2019 या वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही अनेकवेळा चर्चेत आले. राष्ट्रवादीच्या आमदारांना हाताशी धरून, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळं त्यांनी राष्ट्रवादीच्या सगळ्यांचीच नाराजी ओढवली होती. पण, तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीतील प्रचारात त्यांनी पुरंदरमधील माजी आमदारा आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांच्याविषयी केलेले वक्तव्य खूपच गाजले. पुरंदरमधील एका प्रचारसभेत 'बघतोच कसा निवडून येतो,' अशा शब्दांत त्यांनी शिवतारे यांना आव्हान दिले होते. अर्थात, अजित पवार यांनी हे करून दाखवलं आणि विजय शिवतारे यांचा पराभव झाला. 

Image result for sanjay raut esakal

संजय राऊत - 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच'
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात प्रचंड उलथापालथ झाली. काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली. भाजप एकाकी पडला. त्यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी शिवसेनेने संजय राऊत यांच्यावर सोपवली होती. मीडियाशी संवाद साधण्याचे कामही संजय राऊत यांच्याकडेच होते. त्यावेळी संजय राऊत सातत्याने 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच' असं ठामपणे सांगत होते. प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथून डिश्चार्ज मिळाल्यानंतरही बाहेर आल्यावर त्यांनी 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच', असं वक्तव्य केलं होतं. अखेर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि संजय राऊत यांचं विधान खरं ठरलं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: flashback 2019 political leaders and their famous dialogues