निम्मा पूरग्रस्त भाग अंधारातच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

महापुरामुळे विस्कळित झालेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत ५० टक्के भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी, निम्मा पूरग्रस्त भाग अंधारातच आहे.

मुंबई - महापुरामुळे विस्कळित झालेल्या कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत ५० टक्के भागांतील वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी, निम्मा पूरग्रस्त भाग अंधारातच आहे. 

या दोन जिल्ह्यांत महावितरणची ४२ उपकेंद्रे आहेत. त्यापैकी १९ उपकेंद्रे आतापर्यंत सुरू करण्यात आली आहेत. या उपकेंद्रांच्या माध्यमातून सुमारे ५० टक्के वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. रविवारी (ता. ११) कोल्हापूर जिल्ह्यातील एक लाख २२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला. सांगली शहरासह जिल्ह्यातील दीड लाख ग्राहकांचा वीजपुरवठा महापुरामुळे विस्कळित झाला आहे. रविवारी सांगली शहरातील मिरज जॅकवेल व सांगलीवाडीसह अनेक भागांतील ३८ हजार २२६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील महापुरामुळे वीज वितरण यंत्रणा मोठ्या प्रमाणात बाधित झाली आहे. या भागातील वीजपुरवठा तातडीने सुरू करण्यासाठी ऊर्जा रोहित्र, वितरण रोहित्र, विजेचे खांब, केबल, वाहक व अन्य साहित्य इतर परिमंडळांकडून घेण्यात आले आहे. वेगवेगळ्या परिमंडळांतून काही अधिकारी व कर्मचारी ही सामग्री घेऊन कोल्हापूर व सांगली या शहरांच्या वेशीवर दाखल झाली आहेत; परंतु अनेक भागांतील रस्ते अद्याप पाण्याखाली असल्यामुळे त्यांना शहरांत प्रवेश करता येत नाही. पुराच्या पाण्याची पातळी कमी झालेल्या भागांतील वीजपुरवठा मात्र सुरू करण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Area Electricity Darkness