पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ’कडे मदतीचा ओघ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुरामुळे फटका बसलेल्या हजारो कुटुंबांना मदत करण्यासाठी लाखो रुपयांची मदत ‘सकाळ’च्या राज्यभरातील कार्यालयांत रविवारी जमा झाली. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेची अगदी सर्वसामान्यांनाही असलेली प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली अन्‌ मदतीचा ओघ कायम राहिला.

पुणे - पुरामुळे फटका बसलेल्या हजारो कुटुंबांना मदत करण्यासाठी लाखो रुपयांची मदत ‘सकाळ’च्या राज्यभरातील कार्यालयांत रविवारी जमा झाली. सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेची अगदी सर्वसामान्यांनाही असलेली प्रचिती या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली अन्‌ मदतीचा ओघ कायम राहिला.  

सांगली, कोल्हापूर, सातारासह राज्याच्या विविध भागांत जलप्रलयाने थैमान घातले आहे. पूरग्रस्तांसाठी ‘सकाळ समूहा’ने एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. पाठोपाठ समाजालाही मदत करण्याचे आवाहन केले. त्याला गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रविवार हा सुटीचा दिवस असला, तरी ‘सकाळ’च्या कार्यालयांत सकाळपासूनच नागरिक रोख, धनादेश स्वरूपात मदत पोचविण्यासाठी येत होते. अनेकांनी तर ऑनलाइन पद्धतीने त्यांची मदत पोचविली. समाजासाठी काही तरी देण्याची भूमिका असेल, तर त्याला आर्थिक परिस्थितीचे बंधन नसते, हेही या प्रसंगातून दिसून आले.

अगदी १० रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंतची मदत उत्स्फूर्तपणे ‘सकाळ’कडे सोपविली जात आहे. विविध संस्था, उद्योग समूह, गणेश मंडळे, सामाजिक संघटना, व्यापारी, कंपन्या, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळे, हास्यक्‍लब, युवक- युवती संघटना आदींनी आपली मदत ‘सकाळ’कडे सोपविली. पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यासाठी आता गणेश मंडळेही सक्रिय सहभाग घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood Affected Sakal Relief Fund Help