चिपळूणमध्ये जलप्रलय! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

रायगडमध्ये घोड नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन तास थांबविण्यात आली होती. त्यात प्रवाशांचे हाल झाले.

रत्नागिरी : मुंबईसह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसाने खेड, चिपळूण जलमय झाले होते. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांनी रौद्ररूप धारण केले. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगर रस्त्यावर आल्याने, तर चिपळूण-कराड मार्गावर दरडी कोसळल्याने चिपळूणमार्गे रत्नागिरीत येण्याचे दोन्ही मार्ग खुंटले. वीर ते माणगावमध्ये पूर आल्याने कोकण रेल्वे ठप्प होती. त्यामुळे चिपळूणची सगळीकडूनच कोंडी झाली होती.

वाशिष्ठी कोपल्याने पाणी चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात घुसले. प्रशासनासह स्थानिक व्यापाऱ्यांना संकटाची चाहूल लागल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी माल सुरक्षित ठिकाणी हलविला होता. 2005 नंतर प्रथमच चिपळूणकरांनी महापूर अनुभवला. खेड-दापोली मार्गावर दरड कोसळून दुपारपर्यंत हा मार्ग बंद होता. मुंबई-गोवा महामार्गावर जगबुडी पूल वाहतुकीला बंद ठेवण्यात आल्याने मुंबईहून रत्नागिरीकडे येणाऱ्यांची पंचाईत झाली.

रायगडमध्ये घोड नदीने धोक्‍याची पातळी ओलांडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक तीन तास थांबविण्यात आली होती. त्यात प्रवाशांचे हाल झाले होते. दुपारनंतर मार्ग सुरळीत झाला, परंतु गाड्या उशिराने धावत होत्या.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Flood in Chiplun