भावनिक अन्‌ दिलासादायक शब्दांचाच महापूर : नेत्यांतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने बाधितांची लागली पुरती वाट 

mahapur.jpg
mahapur.jpg

सोलापूरः एकीकडे महापुराने बसलेला फटका, जिवीत व जित्राबांची झालेली हानी यातून सावरण्यासाठी सरकार मदत करेल याकडे बाधितांचे लागलेले अन्‌ पाणावलेले डोळे... तर दुसरीकडे बोलघेवड्या नेत्यांकडून होत असलेल्या केवळ भावनिक व दिलासादायक शब्दांच्या महापुराने पिचलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर पुन्हा मीठच चोळले जात आहे. हे सारे कमी म्हणून की काय बड्या नेत्यांनी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने या बाधितांची पुरती वाट लागली आहे. नाही म्हणायला... आगामी दोन-तीन दिवसात मदत करण्याची हमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. याकडे आता साऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. 

एका दिवसात बुधवारी (ता. 14) ढगफुटीने जिल्ह्यात (193.6 मिलीमीटर) दाणादाण उडाली. तर उजनीच्या पाणलोट क्षेत्रातील 241 मिलीमीटरच्या अतिवृष्टीने भीमा नदीला महापूर आला. तब्बल 72 वर्षानंतर सोलापूरकरांनी हा अनुभव घेतला. या अस्मानी संकटात तब्बल 14 जणांचे जीव गेले. पंढरपुरातील घाटाचे बांधकाम कोसळून मजुरांचा जागीच प्राण गेला. अक्कलकोट तालुक्‍यावर कधी नव्हे इतके भयावह संकट कोसळले. अतिवृष्टीने जिल्हाभरातील जवळपास 1.45 लाख हेक्‍टरवरील तर एका अक्कलकोट तालुक्‍यातील 47 हजार हेक्‍टरवरील पिकांची हानी झाली. यामुळे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी थेट अक्कलकोट गाठले. नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरु असल्याने दररोज "अपडेट' येतच आहेत. 


जिल्हाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या सात तालुक्‍यांपैकी पंढरपुरात जिवीतहानी व शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. या प्रकारानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांच्या भेटी सुरु झाल्या. जिल्ह्यात कोरोनाचे संकट अजूनही कमी होत नसल्याचे जाणवते. या साऱ्या संकटांच्या मालिकांतून शेतकऱ्यांसमोर मदतीचा मोठा प्रश्‍न होता. शासन मदत करेल या आशेने डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी शाब्दीक व भावनिक दिलासा दिला. घर वाहून गेलेल्यांसाठी 95 हजारांची तर पाण्यात घर असलेल्यांना पाच हजारांची मदत जाहीर झाली. दरम्यान, काही शेतकऱ्यांच्या हातात तर 3800 रुपयांचे धनादेश पडले. ते पाहून शेतकरी चक्रावलाच. धनादेशावरील रक्कम समजल्यानंतर सांगवी (ता. अक्कलकोट) येथील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या मदतीकडे दुर्लक्ष केले होते. परंतु लोकप्रतिनिधींनी त्यांना गळ घातल्यानंतर ते कसेतरी जमले. तरीही अनेकांना झोळी रितीच राहिल्याचा अनुभव आला. 
सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी मुख्यमंत्री श्री. ठाकरे तसेच विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे दौऱ्यावर होते. या दौऱ्यात श्री. फडणवीस यांनी मुख्यमंत्री थिल्लरबाजी करतात. सरकार चालविण्याचा त्यांच्यात दम नसल्याचे वक्तव्य केले. तर प्रत्युत्तर म्हणून श्री. ठाकरे यांनी श्री. फडणवीस यांच्यावर तोंडसुख घेतले. बिहारमध्ये जावून मी महाराष्ट्राचा आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बिहारवर विशेष प्रेम असल्याचे फडणवीस यांनी भाषणात जाहीर केले होते, हा धागा पकडून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर पलटवार केला. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे ऍड. प्रकाश आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात आले होते. त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. सध्या अतिवृष्टीतून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना मदतीची खरी गरज असताना नेत्यांचे विचित्र बोल ऐकून आधीच पिचलेल्या शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे. डझनभर मंत्री, नेते येऊन भेटले; पण प्रश्‍नासाठी कोणीही एकत्र आले नसल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. 
कोरोनाच्या भीतीतच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रथमच दौरा केला आहे. त्यांच्या दौऱ्यातील प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. राजकारणात असूनही थेट राजकारणी नसलेल्या रिमोटवर सरकार चालविण्याचा अनुभव असलेल्या श्री. ठाकरे यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच असा दौरा केला. त्यामुळे शेतात जाण्यापेक्षा पुलावरूनच त्यांनी सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे, सरकार तुमच्या सोबत आहे, तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, नाराज करणार नाही, नुकसान भरून निघेल पण जिवीतहानी होऊ नये, यासाठी दक्ष रहा असा सल्ला देत शब्दांचाच आधार दिला. 

विशेष... 
- पंचनामे होतील तेव्हा होतील पण बाधितांना थेट मदतीची अपेक्षा 
- सर्वाधिक हानीमुळे अक्कलकोट तालुक्‍याला भेट 
- मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक लाखाची मदत 
- पाऊण टीएमसीच्या कुरनूर धरणात आले दीड ते दोन टीएमसी पाणी 
- जलसंपदा विभागातील मनुष्यबळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष  

- जिल्ह्यातील 243 घरांची पडझड झाली तर 850 जनावरे दगावली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com