डोळ्यादेखत जनावरे वाहत होती... बोटी उलटुन माणसं...

सुस्मिता वडतिले
Saturday, 18 July 2020

संकट कोणतेही असो त्याचे चटके नेहमी मानवासह इतर घटकांना सोसावे लागतात. मग ते पुराचे असो किंवा दुष्काळाचे... गेल्यावर्षी सातारा, सांगली व कोल्हापूरमधील महापूराने जीवीत आणि आर्थिकहानी झाल्याचे आपण पाहिले. त्याआधी केरळमधील महापूरांने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाचे संकट असतानाच आसाममध्ये महापुराने जनजीवन विस्कळीत केले आहे.

पुणे : संकट कोणतेही असो त्याचे चटके नेहमी मानवासह इतर घटकांना सोसावे लागतात. मग ते पुराचे असो किंवा दुष्काळाचे... गेल्यावर्षी सातारा, सांगली व कोल्हापूरमधील महापूराने जीवीत आणि आर्थिकहानी झाल्याचे आपण पाहिले. त्याआधी केरळमधील महापूरांने हाहाकार माजवला होता. आता कोरोनाचे संकट असतानाच आसाममध्ये महापुराने जनजीवन विस्कळीत केले आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचे संकट असताना दुबार पेरणीच्या संकटाचा सामना शेतकरी करत आहे. त्याआधी दुष्काळाशी तो दोन हात करत होता. अशी परिस्थिती कशामुळे निर्माण होती? यातून होणारे नुकसान टाळता येते का? याला नेमकं जबाबदार कोण? संकट आले की असे एक ना अनेक प्रश्‍न पडतात आणि त्याची उत्तरे शोधण्याचा जो तो आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतो. तज्ज्ञांचीही याबाबत वेगवेगळी मते आहेत.

अनेक ठिकाणी झालेली हानी पाहून पूर, महापूर असे शब्द ऐकले तरी मनात भिती वाटते. गेल्यावर्षी  महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर येथे महापूर आला होता. या महापुरात सात दिवस अनेकांची घरे पाण्यात होती. पुरामुळे सुमारे ६७ हजार हेक्टरवरील पीकं नष्ट झाली होती. या महापुरात डोळ्यांदेखत दारातील जनावरे वाहत गेल्याचे अनेकांनी पाहिली. बोट उलटून माणसं बेपत्ता होतानाचे एखाद्या चित्रपटातील चित्राप्रमाणे विश्‍वास न बसणारे वास्तव महाराष्ट्राने पाहिले. या जीवीत आणि आर्थिकहानी मोठ्याप्रमाणात झाली होती. कोल्हापुरात सुमारे तीन हजार ८१३ घरे पडली होती. अजुनही या आठवणी आल्या तरी अंगावर शहारे येतात. सह्याद्री पर्वतरांगेत विशेषत: कृष्णा खोऱ्यातील उगम पावणाऱ्या नद्यांच्या परिसरात अभूतपूर्व अतिवृष्टी झाल्याने पूराचे सर्व रेकॉर्डस मोडले होते. यात न भरुन येणारे नुकसान झाले होते. 

यावर्षी मार्चपासून देशात कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. त्याचाच एक भाग म्हणजे लॉकडाऊन. त्यात जूनपासून सरकारने शिथीलता आणली. त्यामुळे काही प्रमाणात उद्योग- धंदे सुरु झाले आहेत. मात्र, रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांच्या मनात भिती आहे. याचा परिणाम अर्थकारणावर होत आहे. यातच आसाम राज्यात पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येथेही आर्थिक आणि जीवीत हानी मोठ्याप्रमाणात झाली आहे. सुमारे ४४ हजार नागरिकांना १९८ रेलीफ कॅम्पमध्ये स्थलांतरीत केल्याचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनवल यांनी दोन दिवसापूर्वी ट्विटद्‌वारे सांगितले होते. येथील झालेल्या हानीची माहिती त्यांनी दिली आहे.

अशी नैसर्गिक संकटे ही माणसासाठी नवी नाहीत. ही संकटे माणसापुढे सतत नवीन आव्हाने उभी करत असतात. अशा नैसर्गिक संकटांमुळेच माणूस या निसर्गाशी जुळवून कसे राहायचे हे शिकत असतो. मानवी इतिहासात अनेक महान संस्कृती घडल्या आणि संपल्या. त्या या नैसर्गिक संकटांमुळेच. सध्या भारतीय अर्थव्यवस्थेची असणारी स्थिती आणि कोरोनाच संकट अत्यंत बिकट परिस्थितीला जन्म घालत आहे. अशा आपत्तीमुळे लोकांचे जीवन सुरळीत होण्यासाठी खूप मोठ्या काळाची गरज लागेल. ते दिवस परत कधी येतील याची सध्या प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. पूर्वापार निसर्गाचं सुरु असलेल हे चक्र. वातावरणाचे बदल ही गोष्ट आता फक्त बोलायची राहिलेली नाही. याचे परिणाम आपण प्रत्यक्षात पाहतो आहोत. नैसर्गिक आपत्तीमुळं घडलेला आणि मानवी हस्तक्षेपांनी आणखी उग्र केलेला हा विध्वंस आहे. या पार्श्वभूमीवर पुरापासून संरक्षण करण्यावरील आपलं लक्ष आता पुराच्या व्यवस्थापनाकडं वळवणं गरजेचं आहे. सातत्यानं येणारे पूर हे नैसर्गिक घटित असलं, तरी मानवी हस्तक्षेपांचाही परिणाम त्यावर होत असतो. या गोष्टीकडे गाभीर्याने पाहिलं पाहिजे.

जलअभ्यासक रजनीश जोशी यांच्या मते, धरण नदीच्या पाण्यावर नियंत्रण ठेवत असते. जेव्हा प्रचंड पाऊस पडतो तेव्हा पूर नियंत्रणाने व्यवस्था करणे आवश्यक आहे. भौगोलिक परिस्थिती काय आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे. मोठ्या प्रकल्पामधून पाण्याचे नियोजन करून पाणी सोडले पाहिजे. पाणी पुढे जाण्यासाठी वाट नसल्यामुळे पूर येतो. अशावेळी त्यावर उपाययोजना म्हणून नदी प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणी नदीजोडप्रकल्प आणले पाहिजे. दुष्काळी भागात पाणी वळवले पाहिजे. यामुळे पूर नियंत्रण करता येते. 

नदी अभ्यासक ए. जी. पुजारी यांच्या मते काही गोष्टी निसर्गावर अवलंबून असतात. वारा आणि ऊन त्यानुसार पावसाची दिशा ठरते. हवेच्या पोकळीमुळे ज्या त्या परिसरात पाऊस कमी- जास्त पडत असतो. पुराची तीव्रता आणि जास्त पाऊस कोणत्या भागात पडेल हे आजही संबंधित तंज्ञांना सांगता येत नाही. त्यामुळे पुराचे नियंत्रण करणे अवघड आहे. आणि वाढते शहरीकरण हे नदी- नाले- ओढे या प्रवाही वाहिन्यावर आक्रमण करीत आले आहे. या प्रवाहाला वेगाने वाहू जाऊ न दिल्यामुळे जो पाऊस पडतो तो धोक्याचा ठरतो. पाऊस पडल्यामुळे पूर येणं हे चुकीचे ठरेल. पावसाचे पाणी जाण्यासाठी जे मार्ग ठेवायला पाहिजे होते ते ठेवले नसल्यामुळे पूर येतो. 

का येतो पूर...
नदी अभ्यासक पुजारी म्हणाले, प्लास्टिक, पॅकिंग मटेरियल आणि थर्माकोल याच्या अतिवापरामुळे शहरातील पाणी वाहून जाणाऱ्यांचे जे मार्ग आहेत ते मार्ग लहान केले आहेत त्यामुळे पूर येतो. नदी नाल्यात केलेले अतिक्रमण, वाढत जाणारा कचरा यामुळे पात्र उथळ बनून पूर येतो. सातत्यानं येणारे पूर हे नैसर्गिक घटित असलं, तरी मानवी हस्तक्षेपांचाही परिणाम त्यावर जास्त होत असतो. आतापर्यंत केवळ निसर्गाचा कोप म्हणून माहिती असलेले पूर आता मानवी चुका, चुकीची अभियांत्रिकी समीकरणे आणि क्षुल्लक अशा राजकारणामुळे मानवनिर्मित ठरले आहेत. अशा काही कारणामुळे पूर येतात. 
 
पुरामुळे पर्यावरणावर असा परिणाम होतो... 
पूर आल्यावर मोठ्या प्रमाणात सकस माती, सुकी माती एका जागेवरील माती दुसरीकडे हलवली जाते. कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि जपान या भागात सुपीक माती आहे. पुरामुळे मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. पूर आल्यावर तत्कालीन स्वरूपात राहणाऱ्या लोकांना पुनर्वसनाचा धोका संभवतो. अशी संकटे आल्यावर हातावरील पोट आणि शेतकरी वर्गाना अनेक अडचणी येतात. पूर येऊन गेल्यावर त्या त्या भागात विशिष्ट प्रकारचे रोग पसरतात. तो रोग कशातून जन्म घेईल हे सांगता येत नाही. या कारणामुळे अनेकजण दगावतात. काहीजण अपंग होतात. अशा अनेक कारणामुळे अनेकजण रोगाला बळी पडतात, असे पुजारी म्हणाले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Floods in Sangli Satara and Kolhapur Now read the story of Corona virus