चाऱ्याअभावी दूधसंकलनात घट

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

राज्यात पाण्याअभावी जनावरांची चाऱ्याची गरज वाढली आहे. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर दिवसेंदिवस दूधसंकलन घटत असून जनावरांच्या चाऱ्याची उपलब्धता करणे, त्यांना वेळेवर सकस चारा देणे हाच उत्पादनवाढीवर उपाय ठरू शकतो. 
- प्रशांत मोहोड, प्रादेशिक दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, पुणे

दोन महिन्यांत २४ लाख लिटरची घट, जनावरांना मिळेना मुबलक चारा
सोलापूर - राज्यात भयावह दुष्काळ पडला तरीही जनावरांना छावण्यांची प्रतीक्षाच आहे. राज्यातील सुमारे ८२ लाख जनावरांना चाऱ्याची गरज आहे; परंतु सद्यस्थितीत ८६९ छावण्यांद्वारे साडेपाच लाख जनावरांनाच चारा दिला जातोय. उर्वरित जनावरांना मुबलक चारा मिळत नसल्याचा फटका दूध उत्पादनावर झाला असून, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांत राज्याचे दूधसंकलन तब्बल २४ लाख लिटरने घटल्याची माहिती उपायुक्‍त कार्यालयाने दिली. या पार्श्‍वभूमीवर खासगी दूध संघ आता प्रतिलिटर चार ते पाच रुपयांची वाढ करण्याच्या तयारी असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

 पाण्याअभावी जनावरांना हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही. दुसरीकडे सुका चाराही कमी असून सरकी पेंड, सुग्रास यासह अन्य चाऱ्यांचे दर वाढत आहेत. ज्वारीच्या एका कडबा पेंडीसाठी दुग्धव्यावसायिकाला तब्बल ३५-४० रुपये मोजावे लागत आहेत. दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने गावनिहाय चारा छावण्यांची घोषणा केली; परंतु सद्यस्थितीत नगर, बीड, उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांमध्येच ८५९ छावण्या सुरू आहेत,  गोशाळेमार्फत सात; तर स्वयंसेवी संस्थांच्या तीन चारा छावण्या जालना, परभणी, हिंगोली येथे सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या वर्षी दुष्काळामुळे दूधसंकलनात ४० लाख लिटरची घट होईल आणि त्यामुळे दुधाचे दर वाढतील, असे खासगी दूध संघचालकांनी सांगितले.

Web Title: Fodder Milk Collection Decrease