Eknath Shinde News: ठाकरे गटाला खिंडार! माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंतांचा शिवसेनेत प्रवेश | Latest Marathi News | Former Health Minister Dr Deepak Sawant joins Shiv Sena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde News

Eknath Shinde News: ठाकरे गटाला खिंडार! माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंतांचा शिवसेनेत प्रवेश

CM Eknath Shinde News: एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामिल होणाऱ्यांची रिघ लागल्याचे पाहायला मिळाले. उद्धव ठाकरे यांच्या अनेक निष्ठावंतांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्विकारल्याचं पाहायला मिळालं.

ठाकरे गटातील नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. बाळासाहेब भवनात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधी सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेतून अनपेक्षितपणे बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

सध्या शिवसेनेची वाताहत झाली असून पक्षचिन्हासह अख्खा पक्ष भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पण त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

कोण आहेत दीपक सावंत?

दीपक सावंत हे शिवसेनेचे माजी मंत्री आहेत. यांनी विधानपरिषदेचे सदस्यत्व भूषवले आहे. शिवसेनेकडून त्यांनी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

जुलै २००४ मध्ये त्यांची पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवड झाली होती. त्यानंतर २००६ आणि २०१२ मध्ये ते पुन्हा निवडून आले.

डिसेंबर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात दीपक सावंत यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं होते.

याचवेळी त्यांच्याकडे भंडारा आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.