Dapoli Sai Resort scam: साई रिसॉर्ट प्रकरणात नवा ट्विस्ट; सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sai Resort Demolition

Dapoli Sai Resort scam: साई रिसॉर्ट प्रकरणात नवा ट्विस्ट; सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर आणखी एकाला अटक

दापोली रिसॉर्ट प्रकरणी ईडीने अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. त्यानंतर आज दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात तत्कालीन प्रांताधिकारी जयराम देशपांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. साई रिसॉर्टच्या कामासाठी बेकायदेशीर परवानगी दिल्याचा ठपका जयराम देशपांडे यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

जयराम देशपांडे यांना ईडीने सकाळी अटक केली असून आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या चौकशीनंतर जयराम देशपांडे यांना अटक करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील साई रिसॉर्टचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचं नसून रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांचं असल्याचा गौप्यस्फोट जानेवारी महिन्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी केला होता.


साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती.

साई रिसॉर्ट प्रकरणात सदानंद कदम यांनी याआधीच उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हे सगळं सुरू असतानाच सदानंद कदम यांच्या अटकेनंतर सुरू झालेलं सत्र यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.