‘गडकोट गडकोट जय शिवराय’

कैलास माधवराव वडघुले, पुणे
शनिवार, 10 डिसेंबर 2016

महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास तसा खूप प्राचीन, इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या काळातील उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो, हा घाट सातवाहन कुळाची निर्मिती, त्यांनीच जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी हे किल्ले उभारले. इतिहासकारांच्या मते एका प्रदेशातून दुसऱ्या परदेशात माल पाठवताना तो डोंगरवाटांच्या मार्गे पाठवावा लागे, त्यांच्या सुरक्षेसाठी उंच डोंगरांवर उभारलेल्या सैनिकी चौक्या म्हणजे दुर्ग. सातवाहन कुलापूर्वी किंवा नंतरही किल्ल्यांची उभारणी होत राहिली.

महाराष्ट्रातील गडकोटांचा इतिहास तसा खूप प्राचीन, इतिहासात खोलवर डोकावल्यास आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांच्या काळातील उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो, हा घाट सातवाहन कुळाची निर्मिती, त्यांनीच जीवधन, चावंड, हडसर आणि शिवनेरी हे किल्ले उभारले. इतिहासकारांच्या मते एका प्रदेशातून दुसऱ्या परदेशात माल पाठवताना तो डोंगरवाटांच्या मार्गे पाठवावा लागे, त्यांच्या सुरक्षेसाठी उंच डोंगरांवर उभारलेल्या सैनिकी चौक्या म्हणजे दुर्ग. सातवाहन कुलापूर्वी किंवा नंतरही किल्ल्यांची उभारणी होत राहिली. परंतु, जगाच्या इतिहासात राष्ट्रनिर्मितीसाठी गडकोटांचा कल्पकतेने वापर केला तो छत्रपती शिवरायांनीच. 

डोंगर कोरून त्यावर बुरुजांचे मुकुट चढवून शिवरायांनी या सह्याद्रीच्या डोंगरांना कडेकपाऱ्यांना इतिहासात अजरामर केले. शिवरायांनी दुर्गरचना, त्यांचे स्थान महात्म्य, आवश्यकता अशा सर्व बाबींचा अभ्यास करुण त्याचे एक स्वतंत्र दुर्गशास्र बनवलं. त्यांनी नवे गडकोट बांधणे व जुन्या गडकोटांची डागडुजी यात खर्चाच्या बाबतीत कधीच कमी पडू दिली नाही. गडकोटांवरील सैनिक, त्यांच्यासाठी लागणारी युद्धसामग्री आणि उदरनिर्वाहाची व्यवस्था फार बारकाईने हाताळली. शिवकाळात शत्रूच्या प्रतिकाराचे आणि शत्रूवर करायच्या हल्ल्याचे केंद्र म्हणजे गडकोट, त्यामुळे स्वराज्यात गडकोटांना खूप महत्व होते.शिवकाळात गडकोटांवरील सुरक्षा कशी असे यासंदर्भात एक आज्ञापत्र उपलब्ध आहे त्यात म्हटलं आहे...

दुर्गांच्या संरक्षणाचे कार्य फार नाजूक. त्यावर किल्लेदार, हवालदार, सरनोबत इत्यादी अधिकारी नेमायचे, ते नि:स्पृह, कुलवंत, कबिलेदार, विश्वासू, उद्योगी, निर्लोभ, सावध, दुर्गावरील सर्व हशमांचा आणि हाताखालील कामगारांचा विश्वास संपादन करू शकतील असे असावेत. दुर्गावर इतर कामकरी ठेवायचे, तेही चलाख, चोरटे, खुनी, तर्हेवाईक, दारुडे, अमली पदार्थांचे सेवन करणारे, फितवेखोर न ठेवावे. या अशांना दुर्गांवर पायही ठेवू देऊ नये. या आज्ञापत्रावरून शिवरायांचा गडकोटांकडे बघण्याचा दृष्टीकोन लक्षात येतो. स्वराज्यातील आधिकार्यानी जेव्हा शिवरायांकडे गडांवर होणाऱ्या जास्तीच्या खर्चाविषयी तक्रार केली, कोशात काही शिल्लक राहत नसल्याचे राजांच्या ध्यानात आणून दिले तेव्हा शिवरायांनी दिलेले उत्तर बरेच काही सांगून जाते... 

ते म्हणाले, "आपणास राज्य संपादन करणे आहे, दिल्लीन्द्रा सारखा मोठा शत्रू उरावर आहे, तो आला तरी नवे-जुने 360 किल्ले हजरतीस आहेत. एकेक किल्ला वर्षवर्ष लढला, तरी 360 वर्षे पाहिजेत." 

राजांच्या मनातील हे भाकित पुढे खरे ठरले. छत्रपती शिवरायांच्या मृत्युनंतर औरंगजेब बादशाहा तीन लाखांची फौज घेऊन महाराष्ट्रात 25 वर्षे ठाण मांडून होता, परंतु छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व त्यानंतर महाराणी ताराबाई यांनी याच अभेद्य आशा गडकोटांच्या आधाराने शौर्याने झुंज दिली. 

छत्रपती शिवरायांनी गडकोटांच्या साह्याने गनिमीकावा या जगप्रसिद्ध युद्धनीतीला जन्म दिला. तिला विकसित केले आणि यशस्वीरित्या वापरही केला. मराठ्यांच्या इतिहासात खऱ्या अर्थाने अजरामर झाले ते सह्याद्रीतील गडकोटच, छत्रपती शिवरायांचा जन्म ज्या गडावर झाला तो शिवनेरी, शिवरायांच्या पहिल्या विजयाची साक्ष देत प्रचंडगड तोरणा उभा आहे. मुरारबाजींच्या शौर्याची बहादुरीची स्वामिनिष्ठेची साक्ष पुरंदर देतो. सिंहगडाची माती नरवीर तानाजींच्या बलिदानाने आणि सूर्याजी मालुसरेंच्या पराक्रमाने पावन झाली. विशाळगडाच्या वाटेवर पावनखिंडीत बाजीप्रभुंचे, फुलाजी जाधवांचे बलिदान आणि बांदलांचा पराक्रम स्मरतो. अफजलखानाच्या वधाने प्रतापगड गाजला. सिद्दी जोहरच्या 40 हजारांपेक्षा जास्त सैन्याने 6 महिन्यांपेक्षा अधिक काळ वेढा देऊनही जिंकता आला नाही असा पन्हाळा, नंतरच्या काळात कोंढाजी फर्जंद यांनी अवघ्या 60 मावळ्यांनीशी जिंकून इतिहास घडविला. शाहिस्ता खानाच्या स्वारीच्या वेळी कोकणच्या स्वारीवर सुमारे 30 हजारांची फौज घेऊन निघालेल्या कार्तलब खानाला घाटमाथ्यावरून खाली ऊंबरखिंडीत शिवरायांनी स्वतः मोजक्या सैन्याच्या मदतीने कोंडला. या विजयामुळे ऊंबरखिंड संस्मरणीय ठरली. मोठ्या फ़ौजेनिशी चालून आलेल्या दिलेर खानाला आपल्या जवळ असलेल्या अवघ्या 1000 मावळ्यांना बरोबर घेऊन अफाट फ़ौजेवर भयंकर हल्ला करून पळवून लावणारे रामजी पांगेरा कानेरगडावर मात्र धरातीर्थी पडले. 

जफरजंग पदवी घेऊन दक्खनचा सुभेदार म्हणून आलेल्या बहादूर खानास शिवरायांच्या अवघ्या 9 हजार घोडेस्वारांनी योजनाबद्ध रीतीने गुंगारा देऊन त्यांचा संपूर्ण खजिना पेडगावाच्या बहादूरगडावरून अक्षरशः धुऊन नेला. धारवाडजवळच्या बेलवडीच्या गढीतील सावित्री उर्फ मालम्मा या शत्रूच्या स्त्रीला शिवरायांनी दिलेली वागणूक आणि त्यास्तव त्या बाईने राजांची यादवाडजवळच्या देवळात खोदून ठेवलेली शिल्पे आजही महाराजांच्या स्त्रीविषयक दृष्टीकोनाची साक्ष देतात. बुलंद, मजबूत तटबंदीचा आणि भोवताली खंदक असलेला फोंड्याचा किल्ला भुयारे खणून सुरुंग पेरून आणि ताटाला शिड्या लावून जिंकला. सातारयाचा अजिंक्यतारा औरंगजेबाच्या संपूर्ण लष्कराशी कित्येक महीने झुंजत राहिला. नाशिकजवळच्या छोट्याशा रामशेज या किल्याचा कमीत कमी सैन्यानिशी जास्तीत जास्त काळ लढविलेल्या किल्यांमध्ये सामवेश केला जातो. रामशेजने औरंगजेबाच्या अनेक सरदारांच्या नाकात दम आणला होता. चाकणचा भुईकोट किल्ला फिरंगोजी नरसाळा यांच्या पराक्रमाची साक्ष देतो. 

स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान ज्याने मिळवला, छत्रपती शिवरायांनी आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ ज्या गडावर व्यतीत केला तो राजगड... शिवरायांच्या आयुष्यातील अनेक महत्वाच्या प्रसंगांचा साक्षीदार. अनेक मोहिमांसाठी शिवराय याच राजगडावरून बाहेर पडले, सुखदु:खाचे अनेक प्रसंग आणि विजयाचे सोहळे याच राजगडाने अनुभवले. मराठ्यांच्या इतिहासामध्ये सुवर्णअक्षरांनी लिहिला गेलेला शिवराज्याभिषेक सोहळा रायगडाने अनुभवला आणि मराठ्यांच्या इतिहासातील काळा दिवस छत्रपतींचे महानिर्वाण बघणेदेखील याच रायगडाच्या नशिबी आले. छत्रपती संभाजीराजांच्या दुर्दैवी मृत्युनंतर स्वराज्य अडचणीत आलेतेव्हा स्वराज्यापासून 1200 कि.मी. अंतरावर असलेल्या दुरदेशीच्या जिंजीच्या किल्याने मराठ्यांचे छत्रपती राजाराम महाराजांना सात वर्षे सांभाळलआणि हे स्वराज्य परचक्रापासून सुरक्षित राखले. रायगडाच्या राजधानीभोवती शिवरायांनी तीन संरक्षक फळ्या उभ्या केल्या. पहिली फळी म्हणजे अशेरीगडापासून सुरू होऊन पुरंदरमार्गे दक्षिणेतील विशाळगडापर्यंत. दूसरी संरक्षक फळी ही कोकणातील खांदेरी, सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग व सुवर्णदुर्ग या जलदुर्गाची. तीसरी संरक्षक फळी ही विशाळगडापासून ते जिंजी या तामिळनाडुतील किल्याला जोडनारी. शत्रूची ताकद ही आपल्या तकदीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे, याची शिवरायांना जाणीव होती आणि त्यामुळे संहयाद्रीच्या पर्वतरांगा, त्यातील रानवाटा, गडकोट यांचा उत्कृष्ट वापर करुण स्वराज्य स्थापन केले हा या गडकोटांचा इतिहास आहे. 

परंतु शिवसाम्राज्याची सोनेरी पहाट ज्या गडकोटांमुळे आम्हाला बघायला मिळाली, त्यांच्या मनात आज काहीतरी घालमेल सुरू आहे. ऊन, सोसाटयाचा वारा, मूसळधार पाऊस या सर्वांना तोंड देत 350 वर्षांहून अधिक काळ ताठ मानने उभे असलेले या गडकोटांचे बुरुंज आज ढासळू लागलेत, वार्ध्यक्याच्या खुणा त्यांच्या अंगाखांद्यावर जाणवू लागल्या. ज्या शिवसाम्राज्यासाठी या गडकोटांनी आंगावर तोफांचे गोळे हसत हसत झेलले त्या साम्राज्याच्या स्मृती जागविण्यासाठी आजची तरुणाई गडकोट गडकोट जय शिवराय म्हणत याच गडकोटांचे स्मरण करते. जुन्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न होताना दिसतो. काहीतरी नव्याने मांडण्याचाही प्रयत्न होतोय. काही दुर्गवेडे इतिहासप्रेमी आपल्या संसाराकडे दुर्लक्ष करुण, आपलं आयुष्य गडकोटांमध्ये इतिहास जाणून घेण्यासाठी घालवतात. या सर्व गोष्टीचा आनंद या गडकोटांनाही निश्चितच होत असणार. आपल्या गौरवशाली इतिहासाच्या आठवणीत हे गडकोट आजही आनंदाश्रू ढाळत असतील त्यांना आठवत असेल तो गौरवशाली शिवकाळ, ज्याच्या स्मृती चिरकाळ प्रेरणा देत रहाणार आहेत. आजही प्रतापगडाच्या साक्षीने झालेला जावळीच्या खोर्यातील अफजल वधाच्या वेळचा रणसंग्राम जगभरातील लष्करी महाविद्यालयांमध्ये शिकवला जातो, हे सर्व आम्ही अभिमानाने सांगतो, लिहितो. परंतु आज प्रत्यक्ष या गडकोटांची परिस्थिती काय हे जाणून घेतलं की खूप दुःख होतं, मनाला प्रचंड यातना होतात. विज्ञानाने मानवाला प्रचंड शक्ती दिली. भरधाव वेगाने रस्त्यावर धावणरी दोन चाकी, चार चाकी स्वयंचलित वाहने, हवाई मार्गाने जाणारी हेलिकॉफ्टर आणि विमाने, अथांग सागरात पाण्यावर आणि पाण्याखालून प्रवास करणारी जहाजे आणि पाणबुड्या आल्या. काही तासात मनुष्य वाट्टेल तिथे वाट्टेल तितक्या संखेने पोचू लागलाय. आपण विज्ञानाच्या अतिरेकी वापराने आपण वातावरण प्रदूषित केले, जंगले नष्ट केली आणि वैराण वाळवंटे निर्माण केली. फक्त मौज म्हणून पर्यटनासाठी फिरायला येणारांची संख्या प्रचंड वाढली, त्यांना इतिहासाशी काहीही देणे घेणे नसते. मौज मजा लुटायच्या उद्देशाने सगळीकडे मांसाहार आणि मद्यपान सुरू आहे. त्यामुळं गडकोटांचे पावित्र्य धोक्यात आलंय. आमच्याच गडकोटांचे परक्यांनी केले नाहीत एवढे हाल आम्ही स्वकीयांनी केले. शिवकाळातील वैभव काही हाती लागते का हे पाहण्यासाठी अनेकांनी अनेक गडकोट वेळोवेळी खणले गेले, आणि आम्ही हे हताशपणे बघत आलोय. ऊन, वारा, पाऊस-वादळ या नैसर्गिक आप्पत्ती तर येतातच; पण या आपत्तीपेक्षा मानवी दुष्कृत्यांनीच गडकोट जास्त खिळखिळे झालेत. हा नंगा नाच कुठेतरी थांबायलाच हवा, अन्याय करणाऱ्यांप्रमाणेच अन्याय उघड्या डोळ्याने बघणारेही अपराधीच असतात. या न्यायाने जे चाललंय ते थांबविण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहेच. 

आम्ही देव कधी बाघितला नाही, परंतु ज्या छत्रपतींच्या स्वराज्यामुळे देवाचं अस्तित्व सांगणारी मंदिरे सुरक्षित राहिली. ती स्वराज्याची खरीखुरी मंदिरं आज गडकोटांच्या रुपाने आम्हाला बघण्याचं भाग्य मिळालं. त्या गडकोटांचं रक्षण झालं पाहिजे. यासाठी गडकोटांवर सुरू असणारा सामीष आहार थांबल्यावर मद्यपान थांबायला मदत होईल. त्यामुळे शासनाने सर्व गडकोटांवर मांसाहाराला बंदी घालावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण आज जर याकडे दुर्लक्ष केलं तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही हे मात्र निश्चित. 

शिवप्रेमींच्या सरकारकडून प्रचंड अपेक्षा आहेत. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच छत्रपतींच्या आशीर्वादाची भावनिक राजकीय जाहिरात करून भाजपा सरकार सत्तेपर्यंत पोचले. त्याच छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर आहे, तिथे ना लाईटची व्यवस्था, ना माहितीचे फलक,... आणि समाधीशेजारी असलेलं कुत्रं. त्याला मात्र 24 तास पोलिस बंदोबस्त. पोलिस बंदोबस्तासाठी किल्याच्याच मूळ बांधकामावर अतिक्रमण करून पत्र्याची खोली तयार केली आहे. सरकारला शिवरायांच्या समाधीपेक्षा इतिहासात कुठेही नोंद नसलेलं कुत्रा महत्वाचा वाटतो..!! 

रायगडाच्या पायथ्याला पाचाडला राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचा वाडा आहे त्याचाही विकास होणे गरजेचे आहे. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंधखेडराजाला 12 जानेवारी जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने तसेच वर्षभर, लाखोंच्या संखेने लोक भेट देतात, तेथील जिजाऊंचा वाडा पुन्हा उभा करणे गरजेचे आहे.सरकारने गडकोटांच्या संवर्धनासाठी भरीव तरतुदीची घोषणा नुकतीच केली आहे त्या पैशात गडकोटांचा काहीतरी शाश्वत विकास होऊन गडकोटांची डागडुगी व कायमस्वरुपी काही मूलभूत सुविधा निर्माण झाल्यास या गडकोटांचं आयुष्य आजून थोडफार तरी वाढेल. त्यानिमित्ताने रायगडाचा राजदरबार पुन्हा शिवकाळासारखा उभा राहावा, शिवस्वराज्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींची साक्षीदार असलेली राजसदर पुन्हा गजबजावी. महाराजांच्या जीवनातील सुखदुःखाचे पडसाद ज्या राणीवशात उमटत होते त्या राणीवशातली दालने पुन्हा पूर्ववत व्हावी. बाजारपेठेचे बांधकाम पूर्णत्वाला जावे. गडावरील पाण्याची तहान भागवीणाऱ्या विहिरी, पाण्याच्या टाक्या, तलाव, पायथ्या पासून महाला पर्यंतचे वेगवेगळे भव्य दरवाजे, भव्य सुरक्षित बुरुज, असे शिवकाळातील विकसित स्थापत्यशास्त्राचा अविष्कार पुन्हा जगासमोर मांडला जावा. खऱ्या उज्ज्वल इतिहासाची उजळणी व्हावी. छत्रपतींचे किमान पाच गडकोट पूर्ववत उभे राहावे ही शिवप्रेमींची मनातील इच्छा यानिमित्ताने पुढे जावी हीच इथून पुढच्या काळासाठी अपेक्षा..

Web Title: forts of maharashtra : leagacy of chhatrapati shivaji maharaj