विखे-पाटील, मोहिते-पाटील, सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 जून 2019

आशिष शेलार, प्रशांत बंब यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 14 जूनला होणार असल्याचे संकेत देण्यात आले. त्यानंतर या विस्तारापूर्वीच राजकीय नेत्यांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येत आहे. यामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेले राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, अब्दुल सत्तार आणि कालिदास कोळंबकर या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. 

राज्य मंत्रिमंडळातील सात मंत्रिपदं रिक्त आहेत. त्यामुळे या पदांसाठी अनेक नेते उत्सुक आहेत. या रिक्त झालेल्या जागा लवकरच भरल्या जातील, अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकीकडे भाजपचे आमदार मंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार बंडखोर नेत्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. 

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या या चार बंडखोर नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पारडे जड असून, त्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळण्याची शक्यता आहे. 

आशिष शेलार, प्रशांत बंब यांनाही मिळणार मंत्रिपद?

कॅबिनेट विस्तारात भाजप आमदार आशिष शेलार, प्रशांत बंब, अतुल सावे आणि संजय कुटे यांनाही स्थान मिळेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Four Congress MLAs meet Devendra Fadnavis for cabinet expansion