
Child Trafficking : सांगली व बिहारला जाणार तपास पथक; मुलांच्या तस्करी प्रकरणी चार संशयितांना कोठडी
Nashik News : मुलांची तस्करी करताना मनमाड रेल्वे स्थानकावर पकडलेल्या चार संशयितांना चांदवड न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
संशयितांची कसून चौकशी सुरू असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथके तयार करून रवाना करण्यात येणार आहेत, अशी माहिती लोहमार्ग पोलिस निरीक्षक शरद जोगदंड यांनी सांगितले. (Four suspects in custody child trafficking Investigation team go to Sangli and Bihar crime)
महाराष्ट्रातील सांगली येथील मदरशामध्ये शिक्षणाच्या नावाखाली तस्करी करण्यासाठी दानापूर-पुणे एक्स्प्रेसमधून बिहारच्या मुलांना घेऊन येणाऱ्या संशयितांचा डाव रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी हाणून पाडला होता.
जळगाव रेल्वे स्थानकावर २९ मुले आणि एक संशयित आणि मनमाड रेल्वे स्थानकावर ३० लहान बालके आणि चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले होते. या मुलांना नाशिक येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
मनमाड येथे पकडलेले संशयित सद्दाम हुसेन सिद्दिकी (वय २३), नौमान सिद्दिकी (वय २८), एजाज सिद्दिकी (वय ४०), मोहम्मद शहा नवाज (वय २२, सर्व रा. अररिया, बिहार) या चौघांना चांदवड न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
हे चारही संशयित मनमाड रेल्वे स्थानकावरील लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार लोहमार्ग पोलिसांनी पथके तयार करून ते लवकरच सांगली आणि बिहार राज्याकडे रवाना करण्यात येणार आहे.