वीस लाख बालकांना मोफत रोटाव्हायरस लस

Vaccine
Vaccine

मुंबई - अतिसारामुळे होणाऱ्या बालकांमधील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी रोटाव्हायरस प्रतिबंधक लसीकरणाचा राज्यस्तरीय प्रारंभ आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. त्यासाठी कसारा या आदिवासी भागाची निवड या राज्यस्तरीय लसीकरणासाठी करण्यात आली. राज्यातील एक वर्षापर्यंतच्या सुमारे २० लाख बालकांना दरवर्षी मोफत लस देण्यात येणार असून, शासनाच्या नियमित लसीकरणात त्याचा समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटनही आरोग्यमंत्र्यांनी केले. या वेळी पाच बालकांना आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते रोटाव्हायरस लस देण्यात आली. 

रोटाव्हायरसमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका बालकांमध्ये वयाच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये अधिक आढळून येतो. अतिसारामुळे दाखल झालेल्या रुग्णांमध्ये ४० टक्के बालके ही रोटाव्हायरसने ग्रस्त असल्याचे निदर्शनास आले आहे.

अतिसाराचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, कालपासून महाराष्ट्रात या लशीचा समावेश नियमित लसीकरणात करण्यात आला.  त्यानुसार ३४ जिल्हे आणि २७ महापालिका क्षेत्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर सुमारे १ लाख  हजार ८६ अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आल्याचे आरोग्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com