'शिवशाहीला' पैसे देऊन, मरण विकत घेण्यासारखं?

Shivshahi.jpg
Shivshahi.jpg

सुरक्षित प्रवासासाठी एसटी असा महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे हजारो कर्मचारी, एसटीचे चालक हा विश्वास सार्थ ठरवत आले आहेत. मात्र हा विश्वास खरा ठरवण्यात नव्याने दाखल झालेली शिवशाही बस अपयशी होत आहे. शिवशाही बसवर काही चालक हे अनुभव कमी असलेले, तसेच एसटी महामंडळाकडून अधिकृत ड्रायव्हिंग करण्याचं प्रशिक्षण घेतलेले नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. रात्री शिवशाहीने प्रवास करणे म्हणजे पैसे देऊन विकत घेतल्या सारखे आहे. नाशिक -पुणे या प्रवासादरम्यान या अनुभवातून मीही गेलो आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले होते परंतु चालकानी  बस कशी तरी नियंत्रणात आणली आणि सुदैवाने कोणताही अपघात घडला नाही. 

नंतर दुसऱ्या दिवशीच याच महामार्गावर शिवशाही एसटी बस अंधारात विनाचालक सुमारे 800 फुट रस्ता सोडून 27 गाढ झोपलेल्या प्रवाशांसह शेतातून जात एका बाभळीच्या झाडाला धडकली. रस्ता सोडल्याने शिवशाही बस आदळू लागल्याने एका प्रवाशाला जाग आली. त्याने शिवशाही बस चालकाच्या केबीनच्या दिशेने धाव घेतली. पाहातो तर चालक नसतानाही शिवशाही बस धावत असल्याने त्या प्रवाशाचा थरकाप उडाला. स्वतःचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात संबंधित प्रवाशाने चालकाच्या केबीनमधून उडी मारली. हा चित्तथरारक अपघात पुणे-नाशिक रस्त्यावरील भोरवाडी-अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे  झाला. बाभळीच्या झाडाला शिवशाही एसटी बस अडकली नसती तर मोठी दुर्घटना झाली असती. या बसच्या अपघाताची एकच घटना नाहीये. ताजे उदाहरण म्हणजे आजच रायगड जिल्ह्यातील लोणेरेजवळ झालेल्या अपघातात ३१ प्रवासी जखमी झाले आहेत. 

शिवशाही बसचा अपघात कानावर पडणे नवीन राहिलेलं नाही. ही बससेवा सुरु केल्यापासून शिवशाही बसचे बरेच अपघात झालेले दिसत आहेत. या बस खासगी कंपन्यांकडून चालवायला घेतलेल्या आहेत. त्यावर चालक हा खासगी कंपनीचा आणि कंडक्टर हा महामंडळाचा आहे. खासगी चालक हे सुरक्षित सेवा देण्यास सक्षम नसतात. ते प्रशिक्षितही नसतात. त्यांच्या हातात प्रवाशांचा जीव देण्याचे काम सरकारने या शिवशाहीच्या माध्यमातून केले आहे. एसटीमध्ये जेव्हा चालकांची भरती होते तेव्हा त्या चालकांकडे परवाना, बॅच आदी बाबी तपासून चाचणीद्वारे सेवेत घेतेले जाते. चालक म्हणून भरती केल्यानंतरही त्याला विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी प्रशिक्षण देणारी खास वाहने असतात. खासगी चालक हे बेजबाबदारपणे गाडी चालवत असतात. या चालकांना कसलीही भीती आणि जबाबदारीची जाणीव नसते. त्यांच्यावर महामंडळाचे कोणतेही नियंत्रण नाही. कारवाईबाबतचे निर्णयही खासगी ठेकेदाराकडे असतात. त्यांना प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी आहे असे दिसून येत नाही.

खासगी बस चालकांना बसेस वेगाने पळवायची सवय लागलेली असते. त्यांचे वेगावर कसले नियंत्रण नसते. चालक आणि वाहक जेव्हा प्रशिक्षित असतात, तेव्हा त्यांना बस थांब्यावर, फलाटावर गाडी कशी लावायची, हे सगळे शिकवलेले असते. वाहतुकीचे नियम न पाळणे आणि बेदरकारपणे गाडी चालविण्याच्या प्रकारामुळे शिवशाहीचे अपघात वाढले आहेत. तसेच चालकांना पगार कमी असल्याने ते डबल ड्युटी करतात. त्यामुळे चालकाची झोप पूर्ण होत नसल्याने तो सर्वात मोठा धोका आहे. जर चालकांना प्रशिक्षण दिले तर भविष्यातील अपघात टाळण्यास मदत होईल. अन्यथा लोकांमध्ये शिवशाहीबद्दल पैसे देऊन मरण विकत घेतल्याची भावना निर्माण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com