...येथे निघतोय विहिरीतून धूर (व्हिडिओ)

टीम ई-सकाळ
रविवार, 23 जून 2019

- विहिरीतून पांढरा धूर निघत असल्याने नागरिकांमध्ये भीती.

हिंगोली : जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील हट्टा येथे कोरड्या पडिक विहिरीतून अचानक पांढऱ्या रंगाचा धूर निघत असल्याने खळबळ उडाली. कुरेशी गल्लीमध्ये हा सर्व प्रकार घडला असून, विहिरीजवळ खेळण्यासाठी गेलेल्या काही बालकांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर या मुलांनी याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली.

ग्रामस्थांनी महसूल प्रशासनाशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. ही माहिती मिळाल्यानंतर महसूल प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन प्रदूषण विभागाला चौकशी करण्याचे आदेश दिले. सध्या या विहीरीतून दूर निघण्याचे प्रमाण अजूनही सुरूच असून, ही विहिर 50 फूट खोल आहे. त्यामुळे हा धूर विहिरीच्या 25 फूट वर आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. हा धूर या विहिरीतून नेमका कशामुळे निघत आहे, हे कारण स्पष्ट झाले नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्याला भूकंपाचे हादरे बसले होते आणि आता या विहिरींमधून पांढर्‍या रंगाचा धूर निघत असल्याने नागरिक आपापल्या परीने तर्कवितर्क लावत आहेत

दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असून, कोणत्याही माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क साधण्याचे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fume Coming from Well in Hingoli