जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : एमबीए/एमएमएस, औषधनिर्माणशास्त्र आणि अभियांत्रिकी पदवीसह विविध व्यासायिक अभ्यासक्रमांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज भरण्यात अडचणी येत असून राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस गुरुवारपासून (ता.7) सुरुवात झाली. दरवर्षी या अभ्यासक्रमासाठी अर्ज करणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत देण्यात येत असे; मात्र यंदापासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्राची नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज भरताना जाती संदर्भातील रकाना पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्ज स्वीकारला जात नसल्याने हे प्रवेशापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

राज्यातील एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमाचे 40 हजार विद्यार्थी, औषधनिर्माणशास्त्र तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे 20 हजार व अभियांत्रिकी पदवी घेऊ इच्छिणाऱ्या दीड लाख मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक नुकसान होणार आहे. प्रवेश अडचणीत आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी मदतीसाठी युवासेनेकडे धाव घेतली आहे. युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी सोमवारी (ता.11) तंत्रशिक्षण संचनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची भेट घेतली. दरवर्षीप्रमाणे प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे आणि जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास विद्यार्थ्यांना मुदतवाढ देणेची मागणी युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोलंबेकर यांनी केली आहे. 

Web Title: The future of the students lies in the absence of caste verification certificate