गडचिरोलीच्या उपअधीक्षकांवर अखेर निलंबनाची कारवाई

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जून 2019

गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ 1 मे महाराष्ट्र दिनी ही घटना घडली होती.​

मुंबई : महाराष्ट्रदिनी गडचिरोली येथे झालेल्या भूसुरुंग स्फोटात 15 जवान शहीद झाले होते. या नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक शैलेश काळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

गडचिरोलीतील जांभूरखेडा गावाजवळ 1 मे महाराष्ट्र दिनी ही घटना घडली होती. या हल्ल्यासाठी पोलीस उपअधीक्षक काळे यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी काल (ता.20) विधान परिषदेत केली. 

सुरक्षेच्या बाबतीत हलगर्जीपणा केल्यामुळे हा गंभीर प्रसंग ओढवला गेला, असा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी काळे यांच्यावर केला होता. संबंधित नक्षलवादी हल्ल्याचा चौकशी अहवाल मिळाला असून दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दीपक केसरकर यांनी प्रत्त्युतरात दिले होते. मात्र, शैलेश काळे यांना तत्काळ निलंबित करावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केल्यावर केसरकर यांनी काळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. तसेच या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना येत्या आठ दिवसांत नोकरी देण्याचे आश्वासन केसरकर यांनी या वेळी दिले.

जवानांना त्यांचा हक्क मिळतोय, हे विरोधी पक्षासाठी मोठे यश असल्याचे मत धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर व्यक्त केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gadchiroli DySP suspended for Naxal attack